Wednesday, May 6, 2026
HomeBreaking Newsकायर बंधाऱ्याच "जलइतिहास बनला गाळइतिहास......."

कायर बंधाऱ्याच “जलइतिहास बनला गाळइतिहास…….”

Ajay Kandewar,Wani:- पंचायत समिती वणी अंतर्गत असलेले कायर हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव सध्या जलसंकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. गावाच्या शेतीला वर्षानुवर्षे आधार देणारा ‘माथाळी’ बंधारा हा कायरच्या जलव्यवस्थेचा कणा मानला जातो. पूर्वी या बंधाऱ्यात मुबलक प्रमाणात पाणी साठून जवळपास ९० हेक्टर क्षेत्रातील शेती सिंचित होत असे, ज्यामुळे गावाची आर्थिक घडी मजबूत राहिली होती. मात्र, काळाच्या ओघात बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचत गेल्याने त्याची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटली असून आज तो जवळपास निष्प्रभ झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे कायर गावातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून पाण्याअभावी शेती उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. बंधाऱ्याची सध्याची अवस्था पाहता, आगामी पावसाळ्यातही पुरेशा प्रमाणात जलसाठा होण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कायर ग्रामपंचायतीने संबंधित जलसंधारण विभागाकडे अधिकृत निवेदन देत बंधाऱ्यातील गाळ काढणे, खोलीकरण करणे तसेच आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने हाती घेण्याची मागणी केली आहे.

कायर गावाचा ऐतिहासिक वारसा आणि जलसंस्कृती जपण्यासाठी ‘माथाळी’ बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी ठामपणे मांडले आहे. लोकसहभागातूनही कामे पूर्ण करण्याची तयारी दर्शवली असली तरी प्रशासनाने पुढाकार घेऊन निधी व यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. निवेदन देताना सरपंच नागेश घनकसार,कुंदन टोंगे, नंदू अंबोरे उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page