देव येवले,झरी :– तालूक्यातील गणेशपूर – चिलई या रस्त्याची ओवरलोड वाहतुकीमुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रत्यावर होणारी ओवरलोड वाहतूक बंद करावी या मागणीसाठी चिलई गट ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गणेशपूर, चिलई भागात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. डॉलोमाईन खाणीतून मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने. चिलई ते गणेशपूर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. एक वर्षांआधी चिलई ते गणेशपूर हा रस्ता चांगल्या स्थितीत होता. या रस्त्याची वाहतुकीची क्षमता ही 15 टन आहे. मात्र गेल्या एक वर्षांपासून या मार्गावर 30 ते 40 टनची वाहतूक होत आहे. या गावातील गावक-यांना कामानिमित्त मुकुटबन येथे शिक्षण, बँक, बाजार व इतरही कामांसाठी जावे लागते. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्कूलबस चालकही ये जा साठी टाळाटाळ करतात. त्यामुळे काही पालक वर्ग आपल्या दुचाकीने शाळेत विद्यार्थ्यांना सोडतात. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुचाकीचे सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहे. या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सतत चालणाऱ्या ट्रकमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे श्वासनाचे आजार, दमा, डोळ्याचे आजारात वाढ झाली आहे.
याबाबत अनेकवेळा तक्रार करण्यात आली. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर गावक-यांनी चक्का जाम आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दि. 20 सप्टेंबर रोजी या मार्गावर गट ग्रामपंचायत चीलई व परिसरातील गणेशपूर नागरिकांतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सरपंच अनुप बोबडे, सुनील जेऊरकर, पांडुरंग टेकाम, गजानन विधाते, संदीप पावडे, शुभम आसुटकर, राहुल पावडे, व चीलई गणेशपूर येथील नागरीकांची उपस्थिती होती. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी मुकुटबन पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. सबंधित कंपनी कडून लवकरात- लवकर रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.