Ajay Kandewar,Wani Assembly pole:- विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची काल वणी येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली. पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना काल जिल्ह्यात दुसरी सभा वणी येथे घेतली. यावेळी वणी विधानसभा मतदारसंघातील लोटलेला जनसमुदाय परिवर्तनाची दिशा सांगणारा होता.
यावेळी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी बोलताना. आजारी झाल्यावर डॉक्टरची जात पाहून जाता का ? का तो आजार बरा करू शकेल का हे बघता ? मग आमदार निवडून देताना जात बघून का देता ? म्हणून म्हणतो राजू उंबरकर सारखे चांगले उमेदवार निवडून द्या जो तुमच्यासाठी झटेल. यवतमाळ जिल्ह्याची ओळख कापूस म्हणजेच पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून नाही ओळखला जात तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय;. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा कुटुंबाचं पुढे काय होतं याचं कोणाला काही पडलं नाहीये. निवडणुका येतात तेच खासदार, आमदार निवडून येतात, मात्र परिस्थिती जैसे थे आहे.
महाराष्ट्र जातीपातीत विभागला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत ? स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि इतकं असताना पण हे राजकीय पक्ष येतील, तोंडावर पैसे फेकून मारतील, आणि त्यांना खात्री आहे की तुम्हाला कसंही वागवलं तरी तुम्ही त्यांना परत निवडून देणार . हा त्या लोकांचा समज तुम्ही मोडून काढणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही.
जी कामं सरकारने करायची ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहेत. त्यामुळे एकदा माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता एकदा देऊन तर बघा. गेली ५ वर्ष जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुमचा अपमान केला आहे. येणारी निवडणूक हा तुमच्या अपमानाचा बदला घेण्याची निवडणूक आहे. मी तुम्हाला हमी देतो की राजू उंबरकर हा वणीत राहील, इथल्या लोकांच्यासोबत कायम राहील. असे आवाहन राज ठाकरे यांनी केलें.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भातील उमेदवार राजू उंबरकर ( वणी विधानसभा), गणेश बरबडे (चिखली विधानसभा), सचिन भोयर (राजुरा विधानसभा) प्रवीण सुर (वरोरा विधानसभा) अश्विन जयस्वाल (पुसद विधानसभा) सतीश चौधरी (हिंगणघाट विधानसभा) गजानन वैरागडे (वाशिम विधानसभा), संदीप कोरत (अहेरी विधानसभा), घनश्याम निखाडे (सावनेर विधानसभा) आदित्य दुरूगकर ( नागपुर विधानसभा ) यांच्या सह पक्षाचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, राज्य नेते, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला पदधिकारी, तालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष अध्यक्ष यांच्या सह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक नगरसेवक सचिन भोयर यांनी केले तर सूत्रसंचालन हरीश कामारकर यांनी केले.