Ajay Kandewar Wani:- तालुक्यातील चिखलगाव हे कोळसा प्लॉटमुळे वाढत्या धूळ-धुराच्या प्रदूषणाने वेढलेले गाव म्हणून आधीच ओळखले जाते. या प्रदूषणाचा थेट फटका गावकऱ्यांच्या आरोग्यावर अनेक वर्षांपासून बसत असताना, ग्रामपंचायतीने संपूर्ण गावासाठी उपाययोजना करण्याऐवजी सरपंचांनी फक्त स्वतःच्या घरापर्यंत ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टर-टँकरने पाणी मारून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “गाव बुडो, पण माझ्या घरात धूळ नको”—असा संदेश देणारी ही कृती संतापजनक आहे.
या प्रकाराचा व्हिडिओ पुरावा गावकऱ्यांनी माध्यम प्रतिनिधीकडे दिला असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे. ज्या गावात नागरिक श्वसनविकार, डोळ्यांचे आजार आणि सततच्या धुळीमुळे त्रस्त आहेत, त्या गावात सरपंचांनी सार्वजनिक साधनसंपत्तीचा वापर स्वतःच्या सोयीसाठी केल्याचे स्पष्ट दिसून येते. गावकऱ्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे—हे पाणी मारण्याचे काम करण्यापूर्वी एकदाही जनतेचे मत विचारले होते का?“आधी आमचं आरोग्य, नंतर जनता”—अशीच काहीशी भूमिका सरपंचांच्या वागण्यातून दिसून येत असल्याचा आरोप होत आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी जनतेचे आरोग्य जपण्याची असते, मात्र चिखलगावात चित्र पूर्णपणे उलट आहे. सर्व सुविधा घरातच केंद्रीत करण्यामागे हा बहुमान आहे की सरळ गर्व—असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
एकीकडे संपूर्ण गाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेले असताना, दुसरीकडे सरपंच पदाचा उघड गैरवापर होत असल्याचा आरोप बळावत आहे. “पहिले मेरा घर… फिर जनता…” या कृतीतून ‘जनता भा*****में जाए’ असा स्पष्ट संकेत मिळत असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे. हा प्रकार केवळ अनैतिक नाही, तर लोकशाही मूल्यांनाही तडा देणारा आहे. आता या हुकुमशाहीविरुद्ध कारवाई होणार का, की जनतेचे आरोग्य असेच धुळीत जात राहणार—हा प्रश्न चिखलगाव विचारत आहे.

