अजय कंडेवार, वणी:- यवतमाळ जिल्ह्यात व तालुक्यातील नशेच्या काळ्या साम्राज्यावर घाव घालत वणी तालुक्यातील शिरपूर पोलिसांनी इतिहास घडवणारी कारवाई केली आहे. लाखोंच्या MD ड्रग्ससह तब्बल 9.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत शिरपूर ठाण्याने जिल्ह्यातील पोलीस स्टेशन लेव्हलवरील सर्वात मोठी कारवाई करून दाखवली आहे. नशीले पदार्थ विरोधी मोहिमेत ही कारवाई मैलाचा दगड ठरणार आहे.
दिनांक 11 फेब्रुवारी 2026, सायंकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूर ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ट्रॅप (सापळा) रचून संशयितावर पाळत ठेवली. एका संस्थेच्या मागील परिसरात संशयास्पद हालचाली करणारा व्यक्ती केवळ संशयित नसून मुख्य आरोपीचा जवळपासचा असल्याचे निष्पन्न झाले. झडतीदरम्यान साडेपाच लाखांची MD ड्रग्स जप्त करण्यात आली असून, मोबाईल, वाहन व इतर साहित्य धरून एकूण मुद्देमाल सुमारे 9.50 लाख रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या कारवाईने वणी तालुका व आजूबाजूच्या गावांमध्ये सक्रिय असलेल्या ड्रग्स पेडलर नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. चर्चेनुसार या प्रकरणाचे धागेदोरे अनेक गावांतील ठरावीक पेडलरपर्यंत पोहोचत असून, एकाच फोन कॉलवर नशेचा साठा पुरवला जात असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे. यामुळे मोठ्या आंतरजिल्हा ड्रग्स गिरोहाच्या खुलास्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यवतमाळचा ‘सिंघम स्टाईल’ म्हणून ओळखला जाणारा ठाणेदार संतोष मनवर यांचा यवतमाळ येथे गाजलेला कार्यकाळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. MD ड्रग्सच्या मागावर सातत्याने असलेल्या या अधिकाऱ्याने शिरपूर ठाण्यातही आपला दरारा सिद्ध केला आहे. या कारवाईतून आणखी किती धक्कादायक रहस्ये उघड होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(पुढील कारवाई सुरू आहे. आरोपींचे नाव व पत्ता पोलिस नोंद सुरू असताना बातमी घेण्यात आली. सध्या एवढी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे)

