Ajay,Wani : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वणी शहरात देशभक्त नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, निवृत्त सैनिक तसेच विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते अशा २,५०० पेक्षा अधिक नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभाग नोंदविला.
विश्रामगृह येथून सुरू झालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, संत गाडगे बाबा चौक, शहीद भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे लोकमान्य टिळक चौक येथे पोहोचली. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे युवकांचा मोठ्या संख्येतील सहभाग तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजकीय मतभेद बाजूला ठेवून तिरंग्याखाली एकत्र आले. विविध सामाजिक संघटना, जैन समाजाची श्री महावीर बहुउद्देशीय सेवा संस्था, सिंधी समाज संघटना, स्नेहा डेअरी, अंकुश मोबाईल शॉपी तसेच व्यापारी बांधवांनी ठिकठिकाणी पाणी व बिस्कीटचे वाटप केले. नागरिकांनी पुष्पवृष्टी करून रॅलीचे स्वागत केले. वणी पोलीस व वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत रॅलीत सहभाग नोंदविला, तर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी रॅलीच्या मागे स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली. नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध मार्गक्रमण हे रॅलीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.
रॅलीनंतर विश्रामगृह येथे सर्व सहभागींसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. वणी शहरातील आजवरची सर्वात मोठी तिरंगा रॅली ठरलेल्या या उपक्रमातून वणीकरांनी एकजुटीने राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली. शाळा-महाविद्यालये, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महसूल प्रशासन, पोलीस व वाहतूक पोलीस, पत्रकार आणि सहभागी नागरिकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

