Saturday, October 3, 2026
HomeUncategorizedवणी विधानसभेचा विविध प्रश्नांवर आमदार बच्चू कडू यांचा मुंबई विधानपरिषदेत आवाज.....

वणी विधानसभेचा विविध प्रश्नांवर आमदार बच्चू कडू यांचा मुंबई विधानपरिषदेत आवाज…..

Ajay,Wani : वणी विधानसभा मतदारसंघातील WCL प्रकल्पग्रस्त, बेरोजगार युवक आणि स्थानिकांच्या प्रश्नांना आता मुंबईच्या विधानपरिषदेत थेट वाचा फुटली आहे. वणी उपतालुकाप्रमुख शिवसेना धीरज राजूरकर, उपतालुकाप्रमुख शिंदेसेना अनिल उलमाले आणि शहरप्रमुख शिवराज पेचे यांनी ११ ऑगस्ट रोजी वणी येथे रोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आयोजित कार्यक्रमातून स्थानिकांना ८० टक्के रोजगार मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी जोरदार पाठपुरावा केला होता. याच प्रश्नांच्या पुढील पाठपुराव्यासाठी आमदार बच्चू कडू यांना वणी येथे सभेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याचा थेट परिणाम म्हणून ११ सप्टेंबर रोजी मुंबईत विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वणी विधानसभा मतदारसंघातील WCLच्या प्रश्नांची यादी बच्चू कडू यांनी मांडली.

बैठकीत भूसंपादन, पुनर्वसन, रोजगार, शेतपिकांचे नुकसान आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या या प्रमुख प्रश्नांवर ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात आली. WCLने संपादित केलेल्या जमिनीला २०१३च्या भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या चारपट मोबदला, कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी रोजगार, प्रदूषण व माती-दगडांच्या ढिगाऱ्यांमुळे नापीक झालेल्या उर्वरित जमिनीचेही भूसंपादन व योग्य नुकसानभरपाई, तसेच उकणी खंड-१ व मोरडा येथील प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी बैठकीत पुढे आली. त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतमजूर व बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी देण्यासाठी बायोडाटा संकलन करून ८० टक्के स्थानिक रोजगाराचे धोरण प्रभावीपणे राबवावे, अशी मागणीही करण्यात आली.

वणीतील प्रश्नांसाठी स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या पाठपुराव्याचे पडसाद आता मुंबईपर्यंत पोहोचल्याने उपतालुकाप्रमुख धीरज राजूरकर, उपतालुका प्रमुख अनिल उलमाले आणि शहराध्यक्ष शिवराज पेचे यांच्या प्रयत्नांना या बैठकीत महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले आहे. WCLच्या खाणकामामुळे होणारे वायू, जल व ध्वनी प्रदूषण, पिकांचे नुकसान आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम यांची चौकशी करून नुकसानभरपाई, शुद्ध पिण्याचे पाणी व मोफत उपचाराची व्यवस्था करण्याची मागणीही आमदार बच्चू कडू यांनी बैठकीत मांडली. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडल्याची माहिती असून, वणी विधानसभा मतदारसंघातील या प्रश्नांवर पुढील काळात ठोस कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page