Ajay Kandewar,Wani : तालुक्यात ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो वीजपुरवठा खंडित झाला की नागरिकांचा पहिला संपर्क लाईनमनशी होतो. मात्र घराघरांत प्रकाश पोहोचविण्यासाठी हे कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करतात, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. पावसाळ्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे, चिखल आणि विजांचा कडकडाट असो किंवा उन्हाळ्यातील कडक ऊन, लाईनमन आपल्या कर्तव्यापासून मागे हटत नाहीत.
वीजपुरवठ्यातील बिघाड दूर करण्यासाठी अनेकदा मध्यरात्री, दुर्गम भागात किंवा प्रतिकूल हवामानातही लाईनमनना काम करावे लागते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये यासाठी ते तत्परतेने घटनास्थळी पोहोचून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक वेळा जीवितास धोका असतानाही सेवा अखंड ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. वीज गेल्यानंतर होणाऱ्या तक्रारींप्रमाणेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मेहनतीचीही दखल घेणे आवश्यक आहे. त्यांच्या कार्यामुळेच घरे, शेत, उद्योग आणि शासकीय यंत्रणा सुरळीतपणे कार्यरत राहतात.
समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाईनमनच्या जिद्दीला आणि सेवाभावी वृत्तीला सलाम करत, नागरिकांनीही त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही काळाची गरज असल्याचे बोलल्या जात आहे. पाऊस, ऊन आणि वादळातही अखंड सेवा देणारे हे कर्मचारी खऱ्या अर्थाने “प्रकाशदूत” असल्याचे चित्र दिसून येते.

