Ajay Wani: स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न आता राजकीयदृष्ट्या तापण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे विदर्भ नेते म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर विधानपरिषद आमदार आमदार बच्चू कडू प्रथमच यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात येत असून, ११ ऑगस्ट रोजी शेतकरी मंदिरात दुपारी १ वाजता भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कोळसा, माती, डोलामाईट यांसह विविध खाणी, सिमेंट उद्योग तसेच अन्य निमशासकीय व खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक युवक व शेतकरीपुत्रांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, प्रकल्पबाधितांना न्याय मिळावा आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, या प्रमुख मागण्यांभोवती या मेळाव्याचे स्वरूप राहणार आहे. वणीच्या औद्योगिक पट्ट्यात रोजगाराच्या संधी असूनही स्थानिक युवकांचा प्रश्न सातत्याने चर्चेत राहिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हा मुद्दा कितपत आक्रमकपणे मांडतात आणि प्रशासन व उद्योग व्यवस्थेकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बच्चू कडूंच्या वणीतील आगमनाला केवळ रोजगार मेळावा म्हणून न पाहता शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीची चाचपणी म्हणूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. वणीतील शिंदेसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेत असल्याची माहिती समोर येतं आहे.युवक, शेतकरी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे बच्चू कडूंची आक्रमक कार्यशैली पाहता हा कार्यक्रम केवळ औपचारिक सभा न राहता स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारणारा मंच ठरणारआहे. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांचा रोजगार, प्रकल्पबाधितांचा प्रश्न आणि स्थानिक उद्योगांमध्ये रोजगारातील प्राधान्य हा मुद्दा शिवसेनेला वणी विधानसभा क्षेत्रात संघटनात्मक विस्तारासाठी किती लाभदायक ठरतो, हे ११ ऑगस्टनंतर स्पष्ट होणार आहे.

