वणी : नवरात्रोत्सवानिमित्त वणी शहरातील प्रसिद्ध नवशक्ती दुर्गामाता मंदिर, आंबेडकर चौक येथील समितीच्या वतीने यावर्षी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तिपीठ असलेल्या कोल्हापूर येथील माँ महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत वणी नगरीत आणण्यात येणार आहे. दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी, ही अखंड ज्योत आंबेडकर चौक येथील दुर्गामाता मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी दिली.
नवशक्ती दुर्गामाता मंदिर समितीच्या वतीने दरवर्षी एका शक्तिपीठातून मातेची अखंड ज्योत वणीमध्ये आणण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी माहूर येथील रेणुका मातेची, दुसऱ्या वर्षी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेची, तर तिसऱ्या वर्षी हरियाणा, कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत वणीमध्ये आणण्यात आली होती. यावर्षी कोल्हापूर येथील माँ महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत प्रज्वलित करून वणीमध्ये आणण्यात येणार आहे.
या अखंड ज्योतीची विधीवत पूजा व स्थापना करून तिचे पावित्र्य जपण्यात येणार असून, नवरात्रोत्सवाला मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात प्रारंभ होणार आहे. ही ज्योत दुर्गामाता मंदिर, आंबेडकर चौक, वणी येथे भाविक भक्तांच्या दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे.
१० ऑक्टोबरला वणीहून ज्योतयात्रेला प्रारंभ
माँ महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत आणण्यासाठी दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी वणीहून ज्योतयात्रा कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. दि. ११ ऑक्टोबर (रविवारी) रोजी घटस्थापनेच्या दिवशी कोल्हापूर येथे पोहोचल्यानंतर श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन विधीवत ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. १२ ऑक्टोबर रोजी ही अखंड ज्योत वणी येथे आणून दुर्गामाता मंदिरात विधीवत स्थापना करण्यात येणार आहे.कोल्हापूर येथील या ज्योतयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्वखर्चाने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केले असून, इच्छुकांनी यासाठी मंदिर समितीशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामाता मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड ज्योतीच्या यात्रेसाठी मंदिर समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्यासोबत शिवराम आसुटकर, नितीन बिहारी, अमोल बदखल, आणि राजु शिरभाते,सहभागी होणार आहेत.वणी शहर व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी नवरात्रोत्सवात सहभागी होऊन कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मातेच्या अखंड ज्योतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.आव्हान अध्यक्ष रवि बेलुरकर, दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदाडे, अमोल बदखल, स्वप्नील बिहारी, राजकुमार अमरवानी, नितीन मसेवार, धम्मा मनवर, अशोक मांदाडे, संजय लोणारे, अविनाश कामटकर, विनोद मुथा, चंद्रकांत फेरवानी, राजू जयस्वाल, समीर लाभसेटवार, मनु महराज तुगनायत आणि अशोकजी बतरा यांनी केले आहे.

