Ajay Kandewar,Wani:- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर वणीच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे,काही दिवसांपूर्वी विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी फॉर्म घेऊन “जोरदार” इच्छुक असल्याचे संकेत देणारे उबाठा चे मोरेश्वर उज्वलकर हे अधिकृत उमेदवाराच्या संवाद बैठकीत अनुपस्थित राहिल्याने शहरात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी मोरेश्वर उज्वलकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली दावेदारी प्रभावीपणे मांडली होती. “मी देखील सज्ज आहे” असा संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत त्यांचे नाव चर्चेत आले होते.मात्र जागावाटपात यवतमाळची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आणि पक्षश्रेष्ठींनी साहेबराव कांबळे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले. त्यानंतर कांबळे यांनी वणीत येऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीत अनेक पदाधिकारी उपस्थित होते; मात्र उमेदवारीसाठी दंड थोपटणारे मोरेश्वर उज्वलकर कुठेच दिसले नाहीत.याच अनुपस्थितीमुळे आता राजकीय चर्चांना खतपाणी मिळाले आहे. “विधान परिषदेसाठी मोठी घोषणा केली, शक्तीप्रदर्शन केले; पण अधिकृत उमेदवाराच्या बैठकीतच अनुपस्थित राहिले. मग हा राजकीय बॉम्ब फुस्स झाला का?” असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.मोरेश्वर उज्वलकर यांच्या अनुपस्थितीमागे नाराजी आहे की राजकीय रणनीती की फक्त राजकीय स्टंट की नामापुरता स्टंट याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नसली तरी त्यांच्या या भूमिकेची चर्चा मात्र हास्यास्पद रंगू लागली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर एकजुटीचा संदेश देण्याची अपेक्षा असताना त्यांची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. काही अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. अशा परिस्थितीत मोरेश्वर उज्वलकर यांची पुढील भूमिका थंडबस्त्यात आहे .सध्या तरी म्हणावे लागेल “दंड थोपटला खरा, पण बॉम्ब जोऱ्यात फुस्स झाला का?”
प्राध्यापक टीकाराम कोंगरे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी स्पष्ट म्हटले की वरिष्ठांचा आदेश हाच माझा शेवटचा निर्णय असेल वरिष्ठांच्या आदेशाचा कधीही आम्ही समोर गेलेलो नाही आणि जाणार देखील नाही असा स्पष्ट जाब माध्यमांना त्यांनी दिलेला आहे.


