Sunday, August 30, 2026
HomeBreaking NewsMD Drug Trafficking: वणी शहरालाही एम.डीचा विळखा.......

MD Drug Trafficking: वणी शहरालाही एम.डीचा विळखा…….

Ajay Kandewar,Wani:- पाहता पाहता अंमली पदार्थ असलेले एम.डी पावडर यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहर व ग्रामीण भागात वाऱ्यासारखे पोहचत आहे. वणी तालुक्यात अंमली पदार्थांपासून दूर राहिलेले युवक आता एम.डी (मेथैम्पेटामिन) पावडरच्या व्यसनात अडकत आहेत.

वणी शहरातून ग्रामीण भागातही पावडची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे.काही टोळ्यांकडून तरुणांना स्वस्त दरात ते उपलब्ध करून दिले जाते.नुकतेच गुन्हे शाखेच्या टीमने जत्रा रोड वर एक तरुण दुचाकीवर (MH 34 BK 1843) बसून दिसला. त्याला नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव क्षितिज अशोक इंगळे (23) रा. रंगनाथ नगर असे सांगितले. त्याची झडती घेण्यासाठी पोलीस पुढे आले असता त्याने झडतीसाठी नकार दिला. मात्र नंतर पंचासमोर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात एका पन्नीमध्ये पांढ-या रंगाचा पावडर सव्वा 2 ग्रॅम आढळून आले. अधिक चौकशी केली असता ,या ड्रगची 5 हजार रुपये ग्रॅमने विक्री केली जात असल्याची माहिती त्या आरोपीने दिली. सदर ड्रग्ज हे 11 हजार 400 रुपयांचे एम.डी.पावडर जप्त केल्याच्या घटनेवरुन वणी भागासह आता ग्रामीण भागातही चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

•यावर नियंत्रण गरजेचे

नशेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्थानिक संस्थांनी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. आरोग्य केंंद्रात सल्लागारांची नेमणूक, ग्रामसभांमध्ये व्यसनविरोधी ठराव हे उपाय अत्यावश्यक झाले आहेत.

वणी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी पथकाने एकत्रित तपास सुरू केली असून, लवकरच मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात एम.डी. पावडरची वाढती व्याप्ती ही गंभीर सामाजिक व आरोग्य समस्या आहे. वेळेत पावले उचलली नाहीत, तर ही समस्या भयावह रूप धारण करू शकते.

•वणीत मुद्देमाल जप्त.

नुकतीच क्षितिज अशोक इंगळे (23) रा. रंगनाथ, वणी तालुक्यातून अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 11 हजार रु.किंमतीचे सव्वा 2 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेनी ही कारवाई केली. त्यांच्या चौकशीतून पोलिसांना विक्रीचे धागेदोरे सापडणार का? असा सवाल केला जात आहे.

•आरोग्यावर परिणाम…

एमडी पावडरमुळे मानसिक विकृती, चिडचिड, झोपेचा अभाव, आत्महत्येचे विचार यासारखे परिणाम होतात. या व्यसनामुळे शहरासह ग्रामीण भागातील तरुण शैक्षणिक व सामाजिक मार्गांपासून भरकटत आहेत. शहरातील टोळ्यांचे ग्रामीण क्षेत्रात जाळे, नागपूरातील टोळ्यांनी गावागावात एजंट तयार केले असून, हे एजंट तरुणांना आधी नशेच्या गर्तेत ओढतात व नंतर त्यांच्याच हातून विक्री करवून घेतात अशीही चर्चा आहे.

•’पार्टी ड्रग’ची गावांमध्ये घुसखोरी…..

पूर्वी मोठ्या शहरांतील पार्ट्यांपुरता मर्यादित असलेला ”हाय क्लास” प्रकार आता कुरिअर व दूचाकी गाड्यांद्वारे गावांमध्ये सहज पोहोचत आहे. गावातील तरुणांमध्ये एम.डी.च्या वाढत्या व्यसनाचे ग्रामीण भागातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही तरुण शेतीकाम टाळत असून, घरातील पैसे चोरी, गैरवर्तन यासारखी लक्षणे त्यांच्यात दिसून येत आहेत.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page