Ajay Kandewar,Wani:- खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी अनुदानावर बियाणे मिळविण्यासाठी सीएसी केंद्रावर नोंदणी करु लागले आहेत. मात्र, आपले सरकार महाडिबीटी वेबसाईट मागील काही दिवसांपासून बंद झाली आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या दिवसांत शेतकरी अडचणीत आले आहेत.त्यामुळे खरीप तोंडावर असलेल्या शेतकरी हितार्थ बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते ह्या योजनेपासून शेतकरी वंचित राहिले आहेत.या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी मोहदा ग्रा.पं.उपसरपंच सचिन रासेकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग पीक प्रात्यक्षिकमधून १०० टक्के तर उर्वरित ५० टक्के अनुदानावर सोयाबीन, तूर, मूग, उडीद बियाणांचा पुरवठा केला जातो. परंतु, साईट बंद असल्याने नोंदणी होत नाही. अनुदानावर बियाणे मिळावेत, यासाठी शेतकरीजवळील महा ई सेवा सीएसी केंद्रावर जात आहेत. तिथे नोंदणी करताना ओटीपी येतो. तो प्रविष्ट करुन २३ रुपये नोंदणी शुल्क खात्यातून कपात होते. मात्र, पुढील प्रक्रियेवर गेल्यावर सेशन ईरर येऊन नोंदणी पूर्ण होत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.वणी तालुक्यात ( मोहदा ग्रा.पं . हद्दीतील) अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते अनुदानावर बियाणे मिळाल्यावर खरीप करता येईल? या आशेवर असताना बियाणे नोंदणीची वेबसाईट चालत नाही. त्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा बियाणे योजना फसवी तर नाही ना? असा प्रश्न शेतकरी करु लागले आहेत. बियाणे नोंदणीसाठी ३१ मे शेवटची तारीख होती. त्यानंतर कृषी विभागाने मुदतवाढ देत ५ जून शेवटची तारीख दिली.मात्र त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही.वाढीव दिवसात क्वचित शेतकरी यांना अर्ज करता आले मात्र असंख्य शेतकरी यापासून वंचित आहेत.

साईट बंद असल्यामुळे मुदतवाढीचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. असंख्य शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात. साईट चालू नसल्यामुळे आँनलाईन नोंदणी होत नाही. त्यामुळे शासनाने कृषी खात्याला आफलाईन नोंदणी करुन घेण्याचे आदेश द्यावेत. व त्यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी प्रतिक्रिया मोहदा ग्रा.पं.उपसरपंच सचिन रासेकर यांनी व्यक्त केली आहे.

