Ajay Kandewar,Wani : जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या आदेशानुसार वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जिल्हा नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्याची चर्चा सुरू होताच वणी पोलीस ठाणे आणि तालुक्यात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
गोपाल उंबरकर यांचा कार्यकाळ वाद, तक्रारी आणि नाराजीमुळे अधिक गाजला. एका अनुसूचित जातीच्या महिलेची वरिष्ठांकडे पोहोचलेली तक्रार, 420 च्या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यासाठी पत्रकारांना करावे लागलेले आंदोलन आणि कार्यपद्धतीबाबत निर्माण झालेली नाराजी यामुळे त्यांच्यावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. इतकेच नव्हे तर काही कर्मचारीही त्यांच्या कार्यशैलीमुळे त्रस्त असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या.

आता भानुदास पिदूरकर यांच्या रूपाने वणीला नवे ठाणेदार मिळाले आहेत. मात्र बदल फक्त खुर्चीचा न राहता कारभाराचाही व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली पोलीस ठाण्याची प्रतिमा सुधारण्याचे आणि नागरिकांचा विश्वास परत मिळवण्याचे मोठे आव्हान नव्या ठाणेदारांसमोर असणार आहे. वणीकरांच्या भाषेत सांगायचे तर,ठाणेदार बदलला… आता कारभार बदलतो का, हे पाहणे महत्त्वाचे….

वणी ठाण्यात आनंदाचे वातावरण का?
वणी पोलीस विभागातील काही सूत्रांच्या माहितीनुसार, कार्यपद्धतीबाबत कर्मचाऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण असल्याच्या चर्चा वेळोवेळी रंगत होत्या.अधिकृतरीत्या कोणीही याबाबत बोलण्यास तयार नसले तरी ठाण्यातील वातावरण बदलण्याची अपेक्षा अनेक कर्मचारी आणि नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचे सांगितले जाते. गोपाल उंबरकर यांच्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांपैकी असल्याच्या चर्चाही तालुक्यात रंगल्या होत्या; मात्र त्याला कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.


