Ajay Kandewar,Wani:- वणी नगर परिषद परिसरात विधानसभा सदस्यांचा लोगो मिरवणारी चारचाकी दिसल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, ही गाडी आमदारांच्या नावावर नसून एका ठेकेदाराच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. पीयूसी नसल्याचा मुद्दाही चर्चेत असतानाच, आमदारांचा लोगो मिरवून शहरभर फिरणाऱ्या या गाडीचे वेगळेच गौडबंगाल समोर येत आहे. ठेकेदाराची गाडी आणि आमदारांचा शिक्का, हा नेमका प्रकार काय?

आता तर हीच गाडी एका बड्या बिल्डरच्या दारी उभी असल्याचे छायाचित्र समोर आले आहे. त्यामुळे ‘स्वयंघोषित आमदार’ बनून ठेकेदार शहरभर दारोदारी फिरतोय की काय, अशी उपरोधिक चर्चा वणीच्या वर्तुळात रंगू लागली आहे. मोठमोठ्या मंडळींसमोर विधानसभा सदस्यांचा लोगो मिरवून आपला रुबाब दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का, असाही सवाल उपस्थित होत आहे.
गाडी ठेकेदाराची, शिक्का आमदारांचा आणि मुक्काम बिल्डरच्या दारी.हा सगळा प्रकार केवळ योगायोग आहे की यामागे काही वेगळे गणित आहे? संबंधित ठेकेदाराला विधानसभा सदस्यांचा लोगो वापरण्याची अधिकृत परवानगी आहे का, याची प्रशासनाने चौकशी करणे गरजेचे आहे. अन्यथा वणीकरांच्या मनात एकच प्रश्न कायम राहणार “आमदारकीचा शिक्का” मिरवून हा ठेकेदार नेमका कोणता दरारा निर्माण करू पाहतोय?


