Ajay,वणी : मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जपताना आपल्या अभिनयाच्या माध्यमातून नाट्यकलेला मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यकलावंतांचा सन्मान करणे हीच खऱ्या अर्थाने रंगभूमीची सेवा आहे. याच भावनेतून मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत सागर झेप बहुउद्देशीय संस्था, वणीच्या वतीने ज्येष्ठ नाट्यकलावंत गणपतराव अतकारे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष सागर मुने तसेच नाट्यकलावंत आणि बालनाट्य कलावंतांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी गणपतराव अतकारे यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या रंगभूमीवरील योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाचे प्रतिबिंब दाखवणारी आणि विचारांना दिशा देणारी प्रभावी कला आहे. या कलेच्या प्रवासात अनेक ज्येष्ठ कलावंतांनी आपल्या अभिनयाने, मेहनतीने आणि समर्पणाने नाट्यविश्व समृद्ध केले आहे. अशाच कलावंतांपैकी एक असलेल्या गणपत अतकारे यांचा सन्मान करताना जुन्या रंगभूमीच्या आठवणींना उजाळा मिळाला.
विशेष म्हणजे, ज्येष्ठ कलावंतांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमातून नव्या पिढीतील बालनाट्य कलावंतांना ज्येष्ठांच्या कार्याची ओळख होण्यासोबतच रंगभूमीची परंपरा आणि संस्कार जपण्याची प्रेरणाही मिळाली.ज्येष्ठ कलावंतांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या कलाप्रवासाप्रती आदर व्यक्त करणारा सागर झेप बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

