Ajay,Wani : साउंड सिस्टीम आणि डीजे परवानगीच्या मुद्द्यावरून यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुका साउंड असोसिएशनने सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची भूमिका चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता नियमांची अंमलबजावणी करण्यावर भर देणारे पोलीस अधीक्षक, अशी त्यांची भूमिका या प्रकरणातून समोर येत आहे. डीजे परवानगीचा प्रश्न केवळ एका शहरापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्ह्यात नियमांची अंमलबजावणी कशी होईल, हा या वादातील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

साउंड व्यावसायिकांच्या मागण्यांना पाठिंबा देत बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अमरावतीमध्ये डीजे वाजत असेल, तर यवतमाळ जिल्ह्यातही परवानगी मिळावी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, डीजेच्या वापराबाबत प्रशासनाची भूमिका आणि लागू नियम यावरून चर्चेला अपेक्षित तोडगा निघाला नाही. त्यानंतर बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर डीजे वाजवून आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे सांगण्यात येते. या घडामोडींमुळे एसपी कुमार चिंता यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. दबावापेक्षा नियमांना प्राधान्य आणि निर्णय प्रक्रियेत शिस्त, असा संदेश त्यांच्या भूमिकेतून दिसून येत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, वणीचे आमदार संजयभाऊ देरकर यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला साउंड व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, तर दुसऱ्या बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्याची प्रशासनाची जबाबदारी, अशा दुहेरी परिस्थितीत मध्यस्थीचे प्रयत्न सुरू झाले. उपोषणकर्त्यांपैकी एका युवकाची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे; मात्र याबाबत अधिकृत पुष्टी आवश्यक नाही आहे. या संपूर्ण प्रकरणातून एसपी कुमार चिंता यांची कायद्याच्या चौकटीत शिस्त राखण्याची भूमिका आणि लोकप्रतिनिधींनी संवादातून तोडगा काढण्याचे केलेले प्रयत्न ठळकपणे पुढे आले आहेत. डीजे परवानगीबाबत अंतिम निर्णय काय होतो आणि जिल्ह्यात एकसमान नियमांची अंमलबजावणी कशी होते, याकडे आता साउंड व्यावसायिकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंब हतबल
डीजे (DJ) आणि साउंड सिस्टिम व्यवसायावर घालण्यात आलेल्या कायदेशीर बंदीमुळे किंवा कडक निर्बंधांमुळे अनेक व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंब हतबल झाले असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा केवळ एका व्यक्तीचा व्यवसाय नसून त्यावर ट्रान्सपोर्ट चालक, मजूर, तांत्रिक कामगार आणि कलाकार अशा अनेकांची उपजीविका अवलंबून आहे अशा परिस्थितीत त्यांचा घरात जगायचं कसं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

