Ajay, Wani : आमदारकीचे पद नाही, हातात सत्तेची ताकद नाही; तरीही वणी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांसाठी आमदारासारखी धावपळ करणारा नेता म्हणून संजय खाडे यांची ओळख निर्माण झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा कामगार नेते असलेल्या खाडे यांनी पुन्हा एकदा उकणीचा प्रश्न लावून धरत तब्बल २१ वर्षांपासून बंद असलेली वणी–उकणी बससेवा सुरू करून दाखवली. बससेवेअभावी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महिनाभरापूर्वी आंदोलन, निवेदन आणि त्यानंतर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. मंगळवारी बसची पहिली फेरी उकणीत पोहोचली आणि तब्बल दोन दशकांचा प्रवासाचा अडथळा दूर झाला.
उकणी आणि संजय खाडे यांचे नाते केवळ राजकारणापुरते मर्यादित राहिलेले नाही. खाण प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांपासून मूलभूत सुविधांपर्यंत अनेक प्रश्नांसाठी त्यांनी प्रशासनाच्या दारापासून थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आवाज पोहोचविला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची केवळ कागदोपत्री चर्चा न करता संबंधित CMD अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे उकणी परिसरात एखादा प्रश्न निर्माण झाला की, ‘हा प्रश्न कोण लावून धरणार?’ याचे उत्तर म्हणून संजय खाडे यांचे नाव पुढे येताना दिसते. बससेवेच्या पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांसोबत प्रवास करून त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि चालक-वाहकांचा सत्कार करणे, ही त्यांच्या राजकारणातील जनतेशी असलेल्या थेट नात्याचीच प्रचिती ठरली.
पदापेक्षा काम मोठे आणि राजकारणापेक्षा जनतेचा प्रश्न महत्त्वाचा, अशी कार्यशैली खाडे यांच्या भूमिकेतून दिसून येते. उकणीतील २१ वर्षांचा बससेवेचा प्रश्न असो किंवा प्रकल्पग्रस्तांचा हक्काचा मुद्दा प्रश्न हाती घेतल्यानंतर तो मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका आणि त्यांची विशेष शैली सध्या चर्चत आहे.त्यामुळे आमदार नसतानाही ‘आमदारासारखा जनतेत आणि जनतेच्या प्रश्नांत’ सक्रिय असलेला हा कार्यकर्ता आगामी काळात सांगता येणार आहे.

