Ajay,Wani : आगामी जनगणनेत ओबीसींसह VJ, NT आणि SBC प्रवर्गांची जातनिहाय अचूक नोंद व्हावी, यासाठी प्रश्नावलीत स्वतंत्र ओबीसी कॉलम तसेच संगणकीय ‘ड्रॉप-डाऊन मेन्यू’ समाविष्ट करण्याची मागणी सकल ओबीसी महामोर्चा व ओबीसी (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत खुल्या पद्धतीने जातनोंदणी झाल्याने उच्चार, स्पेलिंग आणि स्थानिक नावांतील फरकामुळे जात-पोटजातींच्या नोंदी मोठ्या प्रमाणात विखुरल्या गेल्या आणि आकडेवारीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा संघटनांचा दावा आहे. त्यामुळे यावेळी केंद्रीय व राज्य मागासवर्गीय याद्यांच्या आधारे संगणकीय पर्याय उपलब्ध करून दिल्यास नोंदणीतील तफावत कमी होऊन ओबीसी समाजाची अधिक विश्वासार्ह लोकसंख्या समोर येईल, असा युक्तिवाद वणी ओबीसी संघटनेने SDPO यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
स्वतंत्र नोंदणी न झाल्यास शिक्षण, रोजगार, आरक्षण तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठीच्या धोरणनिर्मितीला आवश्यक असलेली वस्तुनिष्ठ लोकसंख्यात्मक माहिती अपुरी राहू शकते, अशी भूमिका संघटनांनी मांडली.केंद्र सरकारने जनगणनेच्या प्रश्नावलीत तातडीने बदल करून अनुसूचित जाती-जमातींच्या धर्तीवर ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम व ‘ड्रॉप-डाऊन यादी’ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास १ सप्टेंबरपासून देशव्यापी आंदोलन तीव्र करून आगामी जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री, जनगणना आयुक्त, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना पाठविण्यात आल्या.
यावेळी प्रदीप बोनगिरवार, विजय बोबडे, राजू पिंपळकर, नितीन मोहितकर, प्रभाकर मोहितकर, सुभाष वैद्य, गुलाब वांढरे, पुंडलिक मोहितकर, पांडुरंग पंडिले, गजानन चंदावार, सुरेश राजूरकर, अजय चन्ने, किशोर ओचावार, श्याम घुमे, सुधीर थेरे, शरद ठाकरे, डॉ. उत्तम पावडे, भालचंद्र मोहितकर, वैभव डंभारे, गजेंद्र भोयर, मोहन डोंगे, नत्थू चहांदकर, राकेश भोयर, नारायण मांडवकर, दिवाकर नरुले, कृष्णदेव विधाते, श्याम ठाकरे, कैलास मेश्राम, अनिल तेलंग, नामदेव जेणेकर, अनिकेत बदखल, राम खिरटकर, सतीश वराटे, रमेश येरणे, अनिल जांभुळकर, मारोती भोस्कर यांच्यासह बहुसंख्य ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.

