Ajay,Wani:- शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील तहसील चौकापासून मध्यवर्ती बँकेपर्यंतचे तब्बल आठ पथदिवे मागील १५ दिवसांपासून बंद आहेत. शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागातील हा अंधार नागरिकांना दिसतोय.मग बोम्या मारणाऱ्या एकाही नगरसेवकांना का दिसत नाही? नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेले पथदिवे बंद असताना सत्ताधारी असो वा विरोधक, एकाही नगरसेवकाने याची साधी दखल घेतलेली नाही. नागरिकांच्या प्रश्नांवर इतकी गाढ झोप लागली आहे की, मुख्य चौकातील अंधारही त्यांच्या नजरेत येत नाही का.
निवडणुकीच्या काळात प्रभागाचा विकास, नागरिकांची सेवा आणि समस्या सोडविण्याची आश्वासने देत निवडून आलेले नगरसेवक आता नेमके कुठे गायब झाले आहेत? प्रभाग घेतला, पद घेतले, राजकारणही घेतले; पण नागरिकांच्या अडचणींची जबाबदारी घेण्याची वेळ आली की नगरसेवकांची ‘बत्ती गुल’? सत्ताधारी नगरसेवकांना प्रशासनाला जाब विचारण्याची फुरसत नाही आणि विरोधकांना विरोधासाठीही हा मुद्दा दिसत नाही. मग नगरसेवक नेमके नागरिकांसाठी आहेत की केवळ राजकारणाच्या खेळासाठी, असा संतप्त सवाल वणीकरांनी विचारण्याची वेळ आली आहे.
पंधरा दिवसांपासून शहराच्या ‘हार्ट ऑफ सिटी’मध्ये पथदिवे बंद असताना नागरिकांनीच आता आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची गरज आहे. “दिवे बंद आहेत हे दिसत नाही, की नगरसेवकांचे डोळेच बंद आहेत की झोपेचे सोंग घेत आहे ?” असा खोचक सवाल थेट नगरपरिषदला न विचारता नगरसेवकांना विचारला पाहिजे. कारण नागरिकांच्या रोजच्या सुरक्षिततेचा प्रश्न दुर्लक्षित करून केवळ प्रभागातील राजकारण, श्रेयवाद आणि आरोप-प्रत्यारोपात व्यस्त,श्रेयासाठी जागे, केबिनसाठी जागे आणि स्व हिताचा लोकशाहीसाठी जागे?; पण नागरिकांच्या समस्येसाठी मात्र सगळेच झोपेत, अशी परिस्थिती का? कारण रस्त्यावरील अंधारापेक्षा लोकप्रतिनिधींची ही झोपेच सोंग अधिक गंभीर वाटू लागले आहे.नगरपरिषदेत आवाज कोण उठवणार? निवडणुकीत मत मागताना जनता आठवते, मग निवडून आल्यानंतर जनतेच्या रस्त्यावरचा अंधार का दिसत नाही? नगरसेवकांनी आता राजकारण बाजूला ठेवून ही समस्या तातडीने सोडवावी; कारण नागरिकांना आश्वासनांचा प्रकाश नको, रस्त्यावर प्रत्यक्ष दिवे हवे आहेत.

