Ajay,Wani : स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता ओमप्रकाश पेंडकर यांनी पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथील सराफा दुकानातील चोरीचा गुन्हा तांत्रिक तपासाच्या आधारे कौशल्याने उघडकीस आणला. कोणताही ठोस पुरावा नसताना तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून पुणे जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक करण्यात त्यांच्या तपासकौशल्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
या कारवाईत चोरीला गेलेल्या सुमारे ९७ लाख ५० हजार रुपयांच्या मुद्देमालापैकी ६० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा छडा लावत केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल यवतमाळ जिल्हा पोलीस विभागाने घेतली.वणी उपविभागातील दत्ता पेंडकर आणि शिरपूर ठाणेदार संतोष मनवर या दोन अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गौरव करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दत्ता पेंडकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

