Ajay,Wani : तालुक्यातील नांदेपेरा गावातून सुरू असलेल्या अवजड ट्रक वाहतुकीमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ही वाहतूक तात्काळ बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी करत शिवसेनेच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भरधाव ट्रकांमुळे अपघाताचा धोका वाढला असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पादचारी यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. तसेच धूळ, ध्वनीप्रदूषण आणि रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिवसेनेने प्रशासनाला २१ जुलै २०२६ पर्यंत अवजड वाहतुकीचा मार्ग बदलून पर्यायी व्यवस्था करण्याचे अल्टिमेटम दिले आहे. या मुदतीत योग्य ती कारवाई न झाल्यास नांदेपेरा ग्रामस्थांच्या हितासाठी शिवसेनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना चंद्रपूर लोकसभा समन्वयक शुभम गोरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी राहुल पारखी, प्रज्योत ठावरी, नितीन गोरे, अनिकेत चामाटे, गणेश लांडगे, निलेश हेपट, राजू चिडे, निलेश बेलुरकर, मंगेश चिकटे, जतीन गोबाडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

