
Ajay Kandewar,Wani : शहरातील साई मंदिर चौक ते वरोरा रोड परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले फुटपाथ व नाल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी वणी नगर परिषदेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अनेक छोट्या विक्रेत्यांनी, टपरीधारकांनी आणि हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून नगर परिषदेला उल्लेखनीय सहकार्य केले. ज्यांचे संपूर्ण जीवनच फुटपाथवरील व्यवसायावर अवलंबून आहे, ज्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च या छोट्या व्यवसायांवर चालतो, अशा विक्रेत्यांनी कोणताही वाद न घालता प्रशासनाच्या निर्णयाचा आदर केला.
मात्र दुसरीकडे, साई मंदिर चौक, बसस्थानक परिसर ते शेवाळकर बोर्ड परिसरापर्यंत अनेक ठिकाणी नाल्यांवर उभारलेले शेड, कायमस्वरूपी स्वरूपाची अतिक्रमणे आणि व्यावसायिक बांधकामे अद्यापही जागेवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे, संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना केल्या, तरीही काही मुजोर अतिक्रमणधारकांकडून प्रशासनाला सहकार्य करण्याची कोणतीही तयारी दिसून आलेली नाही. गरीब विक्रेत्यांनी नियमांचे पालन केले, मात्र मोठ्या अतिक्रमणधारकांनी प्रशासनालाच आव्हान दिल्याचे विदारक चित्र ठरत आहे.
आता नागरिकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम सर्वांसाठी समान आहे की केवळ गरीबांपुरती मर्यादित आहे? छोट्या विक्रेत्यांनी स्वतःची दुकाने हटवून सहकार्य केले असेल, तर नाल्यांवर आणि फुटपाथवर मोठमोठे शेड उभारून बसलेल्या मुजोर अतिक्रमणधारकांवरही कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा नियम फक्त दुर्बलांसाठी आणि ताकदवानांसाठी वेगळे आहेत का, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. नगर परिषद आता या मोठ्या अतिक्रमणधारकांवर बुलडोझर चालवून समान न्यायाची भूमिका घेणार की नाही, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. आणि जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर अशा अतिक्रमणधारकांचा पर्दाफाश करण्याचे काम विदर्भ न्यूज करेलच आणि जागरूक नागरिक निश्चितच करत राहतील.’आता वनी नगरपरिषदेचे सीईओ कोणती भूमिका घेतात आणि किती राजकारण्यांचा दबावात ते जातात का? ते सुद्धा पाहणं गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे अतिक्रमण काढणारी टीम म्हणजेच कर्मचारी देखील कोणाकोणाचा फोन उचलतात आणि कोणाचे चापलुसी करतात ते सुद्धा पाहणं गरजेचे आहे.

