Sunday, June 7, 2026
HomeBreakingहातावरील जाड कळ (निशाणी) ठरली आरोपींसाठी घातक......

हातावरील जाड कळ (निशाणी) ठरली आरोपींसाठी घातक……

Ajay Kandewar,Wani : मारेगाव तालुक्यातील मार्डा धरणालगतच्या नाल्यातून येणाऱ्या दुर्गंधीच्या तक्रारीनंतर पोलिसांना आढळलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सुरुवातीला एक अनोळखी आणि गूढ प्रकरण ठरत होता. मृतदेहाची अवस्था इतकी गंभीर होती की, ओळख पटविणेही पोलिसांना आव्हान बनले होते. अपघात, आत्महत्या की घातपात, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच तपास यंत्रणेला एक महत्त्वाचा धागा सापडला.

मृत व्यक्तीच्या हातावरील जाड कळ (निशाणी) पोलिसांच्या नजरेत भरली. याच वैशिष्ट्यपूर्ण खुणेच्या आधारे मारेगाव पोलिसांनी तपासाची साखळी जोडण्यास सुरुवात केली. दुसरीकडे शिरपूर पोलिस पथकाने स्वतंत्र माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे काही महत्त्वाच्या लिंक्स उघड केल्या. दोन्ही पथकांच्या संयुक्त आणि समन्वयित कारवाईमुळे मृताची ओळख विनोद सहारे (४२) रा. सिंदेवाही, जि. चंद्रपूर अशी पटली. त्यानंतर दोन्ही पोलिस पथक हे वरोरा दिशेन रवाना झाली.तेथील नागरी गावात जुल्फेकार यांच्या शेतात हा विनोद काम करत असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर उलगडत गेलेल्या तपासात महिलेच्या वादातूनच “विनोद”ची  हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.

तपासात पुढे समोर आलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी विनोद सहारे यांना वरोरा रेल्वे स्थानकातून मोटारसायकलवर बसवून मार्डा धरण परिसरात नेण्यात आले. तेथे तिघांनी संगनमताने त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रविण वरधने, राजू ढेंगळे आणि शंतनू झाडे यांना अटक केली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचा मार्गदर्शनाने Dysp सुरेश दळवी यांच्या सूचनेने वेगवेगळे तीन पथक नेमले होते. त्यातील दोन पथक ही मारेगावचे आणि एक पथक हे शिरपूर ठाण्यातील नेमले होते.पीआय श्याम वानखेडे यांचे मारेगाव पोलीस पथक आणि शिरपूर ठाणेदार संतोष मनवर यांचा पोलीस पथकाने केलेल्या संयुक्त तपासामुळे काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या मर्डर मिस्टरीचा अखेर पर्दाफाश झाला.

मृतदेह कुजला होता, चेहरा ओळखू येत नव्हता; पण हातावरील जाड कळीने तपासाला दिशा दिली आणि अखेर खुनींचा माग काढण्यात आमचा पोलिस पथकाला यश आले.या तपासात आमचे वरिष्ठ डीवायएसपी सुरेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक तयार केले. यात मारेगाव आणि शिरपूर पथकाचा संयुक्त तपासामुळे मर्डर मिस्टरीचा उलगडा झाला.- पी आय. श्याम वानखेडे ( मारेगाव पोलिस स्टेशन)

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page