Ajay Kandewar,वणी : सहकार क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वणी यांच्या वतीने सन २०२६ मधील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मुख्य कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न संस्थेने या माध्यमातून केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. देवीदास काळे होते. यावेळी उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक सुरेश बरडे, लिंगारेड्डी अंडेलवार व रमेश भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. देवीदास काळे यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिकतेसोबतच संस्कार, चारित्र्य आणि मूल्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तात्पुरत्या आकर्षणांपासून दूर राहून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पायल परांडे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या कर्मचारीवृंदाने विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.

