Wednesday, April 15, 2026
HomeBreaking“पडा, मरा आणि मग चौकशी बसवा....

“पडा, मरा आणि मग चौकशी बसवा….

Ajay Kandewar,Wani:-वणी येथील MSRTC बस स्थानक सध्या प्रवाशांसाठी सुविधा केंद्र नसून थेट मृत्यूचा सापळा बनल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. बस स्थानकाच्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी पडलेला खोल व उघडा गड्डा म्हणजे प्रशासनाने प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा घेतलेला ठरावच असल्याचे चित्र आहे. दररोज शेकडो प्रवासी, महिला, वृद्ध, लहान मुले जीव मुठीत धरून या ठिकाणी ये-जा करत आहेत, मात्र तरीही संबंधित प्रशासनाला याचे काहीच देणेघेणे नसल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.

हा गड्डा पाहता कोणालाही धडकी भरावी असा आहे. बसमधून उतरताना जर पाय घसरला, गर्दीत कुणाचा धक्का बसला किंवा रात्री अंधारात हा गड्डा नजरेआड गेला, तर थेट जीवघेणा अपघात होण्याची पूर्ण शक्यता आहे. तरीसुद्धा MSRTC वणी बस स्थानक प्रशासनाने डोळ्यावर कातडं ओढून घेतले असून जणू “अपघात झाला नाही म्हणजे धोका नाही” अशी अजब भूमिका घेतली आहे.

अलीकडेच एका प्रवाशाचा पाय या गड्ड्यात अडकून तो बसखाली जाणारच होता. केवळ नशिबाने मोठी दुर्घटना टळली, पण पुढच्यावेळी हे नशीब कुणाच्या बाजूने राहील याची हमी कोण देणार? की एखाद्या निष्पाप प्रवाशाचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे? ना कुठलाही इशारा फलक, ना बॅरिकेड, ना तात्पुरती दुरुस्ती — म्हणजे थेट “पडा, मरा आणि मग चौकशी बसवा” हाच जणू MSRTC चा कारभार सुरू आहे.प्रवाशांमध्ये प्रचंड संताप उसळत असून प्रशासनाच्या या बेदरकारपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशांचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. जर उद्या या गड्ड्यामुळे अपघात होऊन जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

ही बातमी केवळ इशारा नाही, तर संभाव्य अपघाताची घंटा आहे. आज दुर्लक्ष झाले तर उद्या रक्तपात अटळ आहे. MSRTC वणी बस स्थानक प्रशासनाने तात्काळ हा जीवघेणा गड्डा बुजवून प्रवाशांना सुरक्षितता द्यावी, अन्यथा या निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संतप्त नागरिकांकडून दिला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page