Ajay Kandewar,Wani:- विकासाचे गाजर दाखवून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या चिखलगाव ग्रामपंचायतीत आज लोकशाहीचीच गळचेपी सुरू असल्याचा गंभीर आरोप करत तब्बल आठ ग्रामपंचायत सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने संपूर्ण गावात राजकीय व प्रशासकीय खळबळ उडाली आहे.राजीनामा दिलेल्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक (सचिव) यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायत पूर्णपणे ठप्प झाली असून, विकासाऐवजी फक्त ठरावांची मोडतोड, नियमांची पायमल्ली आणि सदस्यांचा अपमान सुरू आहे.
चिखलगावात विकास कुठेच दिसत नाही, पण अहंकार मात्र प्रत्येक फाईलमधून डोकावत असल्याचे सांगत तब्बल आठ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे देऊन या कारभारावर अविश्वासाचा ठपका ठेवला आहे.सभांमध्ये सदस्य बोलतात, समस्या मांडतात, पण त्या केवळ हवेतच विरतात. कागदावर मात्र सर्व काही सुरळीत असल्याचा दिखावा केला जातो. प्रोसिडिंग कोरे ठेवून सही मागणे हा नवा ‘लोकशाही प्रयोग’ चिखलगावात सुरू असल्याची चर्चा आहे. गाव चालवायचं नसून फक्त सही गोळा करायची, असा हा कारभार नेमका कोणासाठी?विकासकामांबाबत सूचना दिल्या तर उत्तर मिळते की,“मी पाहून घेईन”. पाहून काय घेतलं? हे मात्र गावाला अजूनही कळलेले नाही. नियम गावकऱ्यांसाठी, पण राजकीय सोयीसाठी मात्र नियमांना सुट्टी, अशी स्थिती निर्माण झाल्याचा आरोप उघडपणे होत आहे.
ग्रामपंचायतीचे पैसे कुठे जातात, कसे जातात, का जातात हे प्रश्न विचारण्याची हिंमत केली तर सदस्यांना अडचणीचे समजले जाते. देयके अदा होतात, पण निवडून दिलेल्या प्रतिनिधींना विचारायचे कष्ट मात्र कुणी घेत नाही. ग्रामपंचायत चालवतोय कोण? सरपंच? सचिव? की कुणाची अदृश्य सत्ता? असा सवाल आता गावात चर्चेत आहे.वॉर्डमधील अविकसित भागांची चर्चा केली तर उत्तर येते .“लेआऊटधारकांना सांगा”. मात्र स्वतःच्या भागात विकासकामे आपोआप कशी मार्गी लागतात, याचे गणित ग्रामस्थांना काही केल्या समजत नाही.गावातील प्रश्न तसेच राहतात, कामे ठप्प पडतात, आणि सदस्य मात्र हातावर हात ठेव. अशी परिस्थिती यावरूनसरपंच–उपसरपंच–सचिवांना अहंकाराला कंटाळून सामूहिक राजीनामे आठ सदस्यांनी दिलेले आहे या सदस्यांमध्ये संतोष राजुरकर,अतुल चांदेकर,पंकज भोरे, हरिश्चंद्र कालेकर, सुधीर ठेंगणे, अर्चना वानखेडे, सुचिता भगत, माया माटे हे उपस्थित होते.

