Ajay Kandewar, Wani : वणीतील पंचशील नगर परिसरात उघडकीस आलेल्या सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणाने तंबाखू माफियांचे धाबे दणाणले असताना, या कारवाईतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा मात्र आजही प्रलंबित असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने वेळ न दवडता ठोस, शिस्तबद्ध आणि धडाकेबाज पावले उचलत अवैध तंबाखू रॅकेटचा पर्दाफाश केला, पण गुन्ह्यात थेट वापरात असलेले वाहन MH-24-BL-7051 आणि त्याचा मालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, ही बाब अनेक शंका उपस्थित करत आहे.
112 वरून आलेल्या तातडीच्या कॉलनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक कारवाईनंतर फूड ऑफिसरच्या हस्तक्षेपाने या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले. जप्त प्रतिबंधित तंबाखू, वाहतुकीचा पॅटर्न, कागदपत्रे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि इतर पुराव्यांच्या आधारे चालक, वाहन मालक आणि ‘तो’ मुख्य आरोपी यांची तस्करीतील भूमिका प्राथमिकरित्या स्पष्ट झाली. त्यानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल करण्यात आले.मात्र, इतका स्पष्ट तपास असतानाही गुन्ह्याचे मुख्य साधन असलेले वाहन प्रत्यक्ष जप्तीत दाखवले जात नाही, ही बाब केवळ दुर्लक्ष की जाणीवपूर्वक टाळाटाळ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अन्न व औषध विभागाने या प्रकरणात ‘सप्लाय चेन’च्या मुळावर घाव घालत नियमभंग करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. बनावट परवाने, काळा धंदा, गुप्त वाहतूक याबाबत शून्य सहिष्णुतेची भूमिका त्यांनी कृतीतून दाखवून दिली.परंतु तपासाची सूत्रे पोलिसांकडे गेल्यानंतर वाहन जप्ती, वाहन मालकाचा शोध आणि त्याची चौकशी या कळीच्या मुद्द्यांवर वणी पोलिसांची हालचाल अत्यंत मंद असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.गाडी जप्त न झाल्यास तस्करीमागील आर्थिक साखळी, वरच्या पातळीवरील ‘संरक्षक हात’ आणि संपूर्ण नेटवर्क उघड होणे कठीण होते. त्यामुळे या प्रकरणात वाहन जप्ती ही केवळ प्रक्रिया नसून तपासाची ‘किल्ली’ आहे.
सध्या वणी शहरात एकच थेट प्रश्न……
“इतका गंभीर गुन्हा समोर असताना, वाहन आणि त्याचा मालक नेमके कुणाच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहेत?”फूड ऑफिसरची कारवाई उदाहरण ठरली असली, तरी आता वणी पोलिसांनीही तितकीच ठोस, पारदर्शक आणि वेगवान भूमिका घेणे अपरिहार्य बनले आहे.पुढचा हात कुणावर पडतो, की प्रकरण अर्धवट ठेवले जाते ,याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

