अजय कंडेवार, वणी –जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीच्या वतीने, आझादी का महोत्सव या निमित्ताने, येथील पाण्याच्या टाकी जवळील शासकीय मैदानावर १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुप्रसिद्ध गायक, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते हेमंत बृजवासी यांच्या भव्य जगराता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत असून, या भव्य कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात येत आहे. आझादी का महोत्सव अंतर्गत (१४ ऑगस्ट रोजी) विविध मान्यवरांचा सत्कार, स्वागत समारंभ, तसेच देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करण्यात आले. तर (१५ ऑगस्ट रोजी) संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत हेमंत बृजवासी जगराता कार्यक्रम होणार आहे.
ऍड. कुणाल चोरडिया हे उच्च शिक्षित, तडफदार तरुण नेते असून, सामाजिक जाण असलेले नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत. यावर्षी १५ ऑगस्टचा जगराता कार्यक्रम अतिशय वेगळ्या संगीतमय पद्धतीने साजरा होणार आहे, ज्यामध्ये भक्तिगीत आणि स्वातंत्र्यदिनाचा एक अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची वणीकर नागरिकांना आतुरता आहे.
यंदा तरुणाईच्या हाती समितीची धुरा आल्याने शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमात हेमंत बृजवासी यांचे सादरीकरण हे मुख्य आकर्षण असणार आहे. वणी विधानसभा परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऍड. कुणाल विजयकुमार चोरडिया आणि समितीचे उमेश पोद्दार यांनी केले आहे.

