•संजय खाडे यांच्या पुढाकारातून 3 दिवस “विदर्भ केसरी शंकरपट “.
•खास मेजवानीत २१ फेब्रु. ला ‘हंबरते गाय वासराची’विनोदी नाटकही
अजय कंडेवार,वणी:- वणीतील जत्रा मैदान येथे मंगळवारी ता.20 फेब्रुवारीपासून जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन होणार आहे. 3 दिवस हा शंकरपट रंगणार आहे. स्व.खा.बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या पुढाकारातून या विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. यात लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आले असून राज्यभरातील सुमारे 150 ते 200 बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असणार आहे तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, माजी मंत्री यशोमती ठाकूर, महिला प्रदेश काँग्रेसच्याअध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार एस. क्यू, झामा, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वजाहत मिर्झा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल मानकर उपस्थित राहणार आहेत. शंकरपट निमित्त खास मेजवानी म्हणून २१ फेब्रुवारीला विनोदी नाटक ‘हंबरते गाय वासराची’ हे नाटक ठेवण्यात आले आहे.
वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा शंकरपट दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. एका गटात पूर्णवाढ झालेली बैलजोडी तर तर दुस-या गटात तरुण (गा-हे) बैलांची जोडी सहभागी होणार आहे. यात नाशिक, पुणे, नागपूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव इत्यादी ठिकाणाहून बैलजोडी येणार आहे. तर वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा ही विशेष स्पर्धा राहणार आहेत. यात केवळ वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतक-यांना सहभागी होता येणार आहे.गावगाडा स्पर्धेसाठीही लाखोंचा आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती व संजय खाडे मित्र परिवार परिश्रम घेत आहे.
प्रथमच रंगणार थरार – –
” संजय खाडे शंकरपट ही केवळ बैलांची शर्यत नसून तो आपल्या कृषी संस्कृतीचा एक भाग आहे. गेल्या अनेक शतकांची परंपरा आहे. वणी 26 वर्षांनंतर प्रथमच ही स्पर्धा रंगणार असल्याने वणी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा थरार अनुभवावा.”