Ajay Kandewar,Wani:-चारगाव–कलमना राज्यमार्गावर तब्बल ४७ कोटी रुपयांचा खर्च करून उभारलेली रस्ता योजना अवघ्या दोन वर्षांतच उखडून निघाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विकासाचे मोठे दावे करणाऱ्या प्रशासनासाठी ही बाब गंभीर चिंतेची ठरली असून, रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की जड वाहनांच्या वाहतुकीमुळे थेट नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर वणीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी ३ फेब्रुवारी रोजी आदेश काढत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १४४ अंतर्गत जड वाहनांवर बंदी घातली आहे. राज्य मार्ग क्रमांक ३१७ वरील साखळी क्रमांक १८६/५०० ते १९०/६०० दरम्यान रस्ता अत्यंत खराब झाल्याची नोंद प्रशासनिक आदेशात स्पष्टपणे करण्यात आली आहे.प्रशासनाने ४ फेब्रुवारीपासून दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याचे जाहीर केले असून, तोपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक नियंत्रण शाखेला परस्पर समन्वयाने परिस्थिती हाताळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हा रस्ता केंद्रीय रस्ता विकास निधीतून तयार करण्यात आला होता, तरीही इतक्या कमी कालावधीत रस्ता निकृष्ट अवस्थेत पोहोचणे हे कामाच्या गुणवत्तेवर आणि देखरेखीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
दरम्यान, शिरपूर ते आबाईफाटा जोडणारा रस्ताही विकासाचा नव्हे तर दुर्दशेचा प्रतीक ठरत आहे.
अवघ्या चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी शासनाने ४ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद केली असली, तरी प्रत्यक्षात या मार्गावर मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळते. परिस्थिती इतकी भयावह झाली आहे की दुचाकीस्वारांनी या रस्त्यावरून जाणेच टाळले असून, जीव धोक्यात घालण्यापेक्षा रस्त्यालगतच्या जंगलातून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना सुरक्षित रस्ते देता येत नसल्याचे हे विदारक चित्र आहे.

