Saturday, May 2, 2026
HomeBreakingसहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची सर्रास पायमल्ली! बंद असलेल्या “आपले सरकार सेवा केंद्रा”वरून प्रमाणपत्रांची...

सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची सर्रास पायमल्ली! बंद असलेल्या “आपले सरकार सेवा केंद्रा”वरून प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू…

Ajay Kandewar,Wani – केळापूर येथील सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बंद करण्यात आलेल्या झरी जामणी येथील आपले सरकार सेवा केंद्र चालक अमोल मंचलवार यांच्या “आपले सरकार सेवा केंद्रा”वरूनच शासकीय प्रमाणपत्रांचे प्रमाणन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या आदेशाची उघड पायमल्ली होत असल्याचा आरोप होत असून तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संदर्भात भाजप युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष हर्षल अग्रवाल यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, केळापूर यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.तक्रारीनुसार, आपले सरकार सेवा केंद्र चालक अमोल मंचलवार यांचे “आपले सरकार सेवा केंद्र” प्रशासनाच्या आदेशाने बंद असतानाही त्याच आयडीवरून विविध शासकीय प्रमाणपत्रांचे प्रमाणन होत असल्याचे आढळून आले आहे. शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र बंद असताना कोणतेही व्यवहार करणे किंवा आयडीचा वापर करणे बेकायदेशीर असतानाही हा प्रकार सुरू असल्याने शासन निर्णयांचे उघड उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रतिज्ञापत्र तयार करून तहसील कार्यालयात सादर केले असताना निवासी नायब तहसीलदारांकडून ते प्रमाणित करण्यास नकार देण्यात येत असल्याची बाबही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. नागरिकांना “सेतू धारकांना सोबत आणावे” अशी अट घालण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम २०१५ च्या तरतुदींना धक्का बसत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.तसेच ग्रामपंचायत हद्दीतील इतर अधिकृत केंद्रांमधून प्रतिज्ञापत्र तयार करू नये असा अप्रत्यक्ष दबाव टाकून केवळ आपले सरकार सेवा केंद्र चालक अमोल मंचलवार यांच्या केंद्रातूनच प्रमाणपत्रे तयार करण्याचा अपप्रचार केला जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार स्पर्धाविरोधी असून प्रशासकीय पारदर्शकतेलाही बाधा पोहोचवणारा असल्याचे हर्षल अग्रवाल यांनी नमूद केले आहे.

या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर बंद कालावधीत करण्यात आलेल्या सर्व प्रमाणपत्रांची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, संबंधित केंद्र तात्काळ ब्लॅकलिस्ट करून आयडी कायमस्वरूपी निष्क्रिय करावा तसेच निवासी नायब तहसीलदारांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून नागरिकांना दिलेल्या त्रासाबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार हर्षल अग्रवाल यांनी केली आहे.दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे झरी जामणी परिसरात प्रशासनाच्या कामकाजाबाबत तीव्र चर्चा सुरू झाली असून आता सहाय्यक जिल्हाधिकारी या प्रकरणात कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page