Ajay kandewar,Wani:- आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना, ठाकरे गटाकडून वणी शहरात संघटनाला अधिक बळकट करण्यासाठी मनीष बत्रा यांना पद नाही तर म्हणून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.ही नियुक्ती साधी नाही,तर थेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून देण्यात आलेली आहे. यामुळे आगामी काळात नगरपरिषद निवडणुकीच्या रणांगणात ठाकरे गटाचा “मेगा प्लॅन” असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

वणी शहरात ठाकरे गटाला गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु हे वातावरण ठोस मतदानात परिवर्तित करण्यासाठी खंबीर नेतृत्व आणि संघटन कौशल्याची आवश्यकता होती. त्या पार्श्वभूमीवर मनीष बत्रा यांची नियुक्ती ही जमेची बाजू मानली जात आहे. संघटक म्हणजे फक्त पद नाही, तर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना, समाजघटकांना जोडणारी कडी आहे. या पदावरूनच निवडणुकीच्या समीकरणांना दिशा मिळते.मनीष बत्रा हे कार्यकर्त्यांशी सतत संपर्कात राहून, संघर्षातून पुढे आलेले आणि संघटनाची नाडी समजून घेणारे व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या नियुक्तीमुळे ठाकरे गटाने केवळ पक्षाचा आत्मविश्वास वाढवला नाही, तर कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य संचारले आहे. “वरिष्ठांनी टाकलेला विश्वास तडा जाऊ देणार नाही, शहर संघटनाला बळकट करून नगरपरिषदेत ठाकरे गटाचा विजय सुनिश्चित करू,” अशी ठाम भूमिका स्वतः मनीष बत्रा यांनी मांडली आहे.
आगामी काळात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात ही नियुक्ती गुणाकाराची चाल ठरणार आहे, असे स्पष्ट दिसून येते. कारण संघटन हीच खरी ताकद आहे. ज्या पक्षाकडे संघटन मजबूत आहे, तोच पक्ष मतदारसंघात आपली पकड घट्ट करतो. त्यामुळे मनीष बत्रा यांच्या नेतृत्वातून वणी शहरात ठाकरे गट अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.अखेर, मनीष बत्रा यांच्या “संघटन” क्षमतेवर ठाकरे गटाने टाकलेला विश्वास हा निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरणार का? याकडे आता वणीकरांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

