● मारेगाव येथे माकपचे पक्ष शिक्षण शिबीर संपन्न
नागेश रायपूरे,मारेगाव : “उत्पादनाच्या साधनांवर मूठभर धनिकांचे प्रस्थ असून त्यांनी देशातील ९९ टक्के श्रमिकांवर गुलामगिरी लादून विषमतावादी व्यवस्था निर्माण केलेली आहे. हीच भांडवलदारी व्यवस्था संपविण्यासाठी कार्ल मार्क्स ने जे तत्वज्ञान मांडले त्या आधारेच कम्युनिस्ट कार्य करीत असून ह्या विषमतावादी भांडवलशाही व्यवस्थेला संपविणे व उत्पादनाची साधने जनतेच्या मालकीची असणारी व्यवस्था आणणे हे कम्युनिस्टांचे ध्येय आहे व त्यासाठी कष्टकऱ्यांनी एकजुटीने संघटना मजबूत करीत कष्टकऱ्यांची सत्ता प्रस्थापित करावी.” असे आवाहन माकपचे राज्य कमिटी सदस्य कॉ. शंकरराव दानव यांनी मारेगाव येथील पक्ष कार्यकर्ता शिक्षण शिबिरात केले.
![](https://vidharbhnews.com/wp-content/uploads/2022/09/20220919_110832-BlendCollage.jpg)
![](https://vidharbhnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220916_125124-1024x699.jpg)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दि. १४ ते २४ सप्टेंबर २२ ह्या दरम्यान पक्ष शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मारेगाव येथील शंकर मंदिराच्या आवारात शिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी कॉ. रामभाऊ जीड्डेवार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. शंकरराव दानव, जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी व जिल्हा कमिटी सदस्य कॉ. ऍड. दिलीप परचाके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. मनोज काळे, कॉ. किसन मोहूर्ले उपस्थित होते.
![](https://vidharbhnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG-20220915-WA0005-1024x1024.jpg)
या शिबिराला मार्गदर्शन करीत असताना कॉ. दानव पुढे म्हणाले, “समाजवादी ध्येय गाठीत असताना कष्टकऱ्यांच्या एकजुटीला जातीव्यवस्था व धर्मांधता अडसर असून ह्या जातीव्यवस्था व धर्मांधतेला खतपाणी घालण्याचे काम सातत्याने भांडवलदारांच्या पैशावर चालणारे पक्ष करीत आहेत. मानवाला विभागणारी व विषमता निर्माण करणारी व्यवस्था नष्ट करण्यासाठी जनतेने मुलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून संघर्ष वाढवावा व एकजूट वाढवावे.”
या शिबिराला कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी संघटनात्मक व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनी पक्षाच्या संघर्षात्मक इतिहासाची मांडणी केली.
![](https://vidharbhnews.com/wp-content/uploads/2022/08/flat-1024x792.jpeg)
या शिक्षण शिबिराला मारेगाव तालुक्यातील प्रमुख पक्ष कार्यकते उपस्थित होते. शिबिराला यशस्वी करण्यासाठी बंडू मटकूलवार, शेख जाकीर, श्रीहरी शेंद्रे, बाळू मेश्राम, वैभव मजगवली, सुधाकर सोनटक्के, उत्तम सोयाम, अशोक ढोले आदींनी परिश्रम घेतले.