Sunday, November 29, 2026
HomeBreakingस्वभाव शांत,बोलण्यात 'Low बीपी'...पण कारवाईचा आलेख मात्र High B.P सारखा......

स्वभाव शांत,बोलण्यात ‘Low बीपी’…पण कारवाईचा आलेख मात्र High B.P सारखा……

Ajay Kandewar,Wani:- पोलीस ठाणेदार म्हटले की कडक आवाज, आक्रमक स्वभाव आणि अधिकाऱ्यांचा दरारा, अशी सर्वसाधारण प्रतिमा असते; मात्र वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी या प्रतिमेपेक्षा वेगळीच कार्यशैली निर्माण केली आहे. बोलण्यात कमालीचा संयम, वागण्यात आपुलकी, चेहऱ्यावर शांतपणा आणि संवादात ‘हो, ठीक आहे‘ अशी सहज भूमिका; मात्र कारवाईच्या बाबतीत कोणतीही माघार नाही.६ जून २०२६ रोजी त्यांनी वणी पोलीस ठाण्याची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर २८ नोव्हेंबरपर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळातील कारवाईचा आढावा घेतला असता, शांत स्वभावाच्या या अधिकाऱ्याच्या कामाचा आलेख मात्र चांगलाच लक्षवेधी ठरतो. विशेष म्हणजे, तक्रारदारांशी सौजन्याने संवाद साधणे, कर्मचाऱ्यांशी आपुलकीने वागणे आणि कोणालाही अपमानास्पद शब्द न वापरता ठाण्याचा कारभार सांभाळणे, ही त्यांच्या कार्यशैलीची स्वतंत्र ओळख बनली आहे.

 धंद्यांविरोधातील कारवाईची आकडेवारीही बोलकी

अवैध धंद्यांविरोधातील कारवाईची आकडेवारीही बोलकी आहे. त्यांच्या कार्यकाळात कोंबड बाजाराच्या २, मटका व जुगाराच्या ६३ आणि पत्ता जुगाराच्या ३ अशा एकूण कारवायांमध्ये ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देशी दारूविरोधात ३९ गुन्ह्यांत ४५ हजारांचा मुद्देमाल, तर एकूण दारूबंदी कारवायांमध्ये २५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायद्यांतर्गत ४ कारवायांत १ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल, आर्म्स ॲक्टअंतर्गत ३ कारवाया, प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गोमांस जप्तीच्या ११ कारवायांत सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल आणि कोटपा कायद्यांतर्गत ४३ कारवाया करण्यात आल्या. प्रतिबंधात्मक कारवाईतही कलम १२६ अंतर्गत ३७२, कलम १४४ अंतर्गत ६४, कलम १२९ अंतर्गत ४३, कलम १२८ अंतर्गत १७, कलम १३ अंतर्गत ९, कलम १२४ अंतर्गत ४, कलम ३३ RW अंतर्गत १२ आणि कलम १४१ अंतर्गत ९ कारवाया झाल्या. कलम १४२ अंतर्गत एक तडीपार कारवाई करण्यात आली असून आणखी काही तडीपार प्रस्ताव प्रक्रियेत असल्याची माहिती आहे. या आकडेवारीतून अवैध धंदे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची व्याप्ती स्पष्ट होते.

विशेष म्हणजे, मनुष्यबळाची कमतरता असतानाही वणी ठाण्याचा कारभार सांभाळण्याचे आव्हान मोठे आहे.

सध्या वणी पोलीस ठाण्यात ९ अधिकारी आणि ६० अंमलदार असे एकूण ६९ जणांचे मनुष्यबळ आहे. २०१८ मध्ये ही संख्या सुमारे १२० होती. लोकसंख्या वाढली, कामाचा व्याप वाढला, नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या; मात्र पोलिसांचे मनुष्यबळ कमी झाले. अशा परिस्थितीतही पिदुरकर यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कामकाज सुरू ठेवले आहे. त्यांच्या कार्यशैलीत दिखावा नाही, अनावश्यक प्रसिद्धीचा हव्यास नाही आणि बोलण्यात आक्रमकतेचा आविर्भाव नाही. मात्र कामाच्या बाबतीत शिस्त आणि कारवाईत सातत्य दिसून येते. ठाणेदाराचा दरारा हा मोठ्या आवाजात नसतो, तो त्याच्या कामातून निर्माण होतो, याची प्रचिती वणी पोलीस ठाण्याच्या या शांत ठाणेदाराच्या कार्यशैलीतून येत आहे. स्वभाव शांत, संवाद संयमी; पण कारवाईचा आलेख मात्र रग्गड.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page