•विजय पिदुरकरांचा निवेदनातून इशारा.
•वेकोलीचे पोकळ आश्वासने देऊन 4 महिन्याचा कालावधी पूर्ण.
अजय कंडेवार,वणी :- परिसरात प्रदूषणात वाढ झाली असुन रस्त्यालगतच्या शेतींना याचा मोठा फटका बसत आहे. साखरा ते शिंदोला रस्त्यालगत वेकोलीच्या कोळसा धुळीमुळे पिकांची उत्पादन क्षमता कमी होऊन झालेल्या नुकसानीचा, प्रदूषण कायद्या नुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी वणी यांना विजय पिदुरकर माजी जि.प. सदस्य यवतमाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान यावर योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी निवेदनातून देण्यात आला.
वेकोली वणी एरिया अंतर्गत मुंगोली, कोलगांव पैनगंगा खाणीतील साखरा ते शिंदोला मार्गे शिरपूर घुग्घुस रेल्वे साईडिंग येथे कोळसा वाहतुक मधुन उडणारे धुळीचे कण व गाडीतून कोळश्याचे ढेले पडून, त्यावर चाललेल्या वाहनाने चुरी झाल्याने, ते हवेव्दारे रस्त्यालगतच्या कोलगांव, साखरा, शिवनी, येनक, येनाडी, शेवाळा, शिंदोला, कुर्ली या आठ गावातील शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, तूर व इतर पिके फुल, पाकळया व पानावर धुळ साचून प्रकाश संश्लेषणाची क्रिया बंद पडल्याने पाकळया गळून पडणे, झाड मरणे, कापूस काळा होणे यामुळे उत्पादन खर्च वाढून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. याबाबत रस्ता रोको दरम्यान दिलेले लेखी आश्वासनानुसार सुचनेवरुन तालुका कृषि अधिकारी, वणी यांनी अहवाल सादर करुन जवळपास 1 महिन्याचा कालावधी लोटून सुध्दा वेकोलीने शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीचे भरपाई अद्यापही नुकसान ग्रस्तांना दिलेली नाही.
शेतकऱ्यांना वेकोलीच्या बेकायदेशीर रस्ता वाहतुक नियमानुसार व Air (Prevention and Control of Pollution) Act 1981 चे उल्लंघन करुन शेतपिकाचे नुकसान झाले त्याची भरपाई मिळण्याकरीता शेतीचे महत्वाचे काम सोडून भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने आंदोलन करावे लागत असेल तर कृषिप्रधान देशाच्या दृष्टिने हि बाब अतिशय गंभीर आहे? असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला आहे. वेकोलीने आश्वासनदेऊन 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. याकरीता कृषि विभागाकडून नुकसानीचा उत्पादन व उत्पन्न अहवाल दिल्यानुसार भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्याचे आधीच नैसर्गिक आपत्तीने कंबरडे मोडले असून वेकोलीने मानवनिर्मीत कोळसा धुळ प्रदुषनाने नुकसान केल्याने शेतकऱ्याचे जगणे मुश्कील झाले आहे.
पत्र संदर्भ (Letter Reference)
” रस्ता रोको आंदोलन येनाडी फाटा दि. ३१/०७/२०२३ ला आपल्या उपस्थितीत वेकोलीने दिलेले लेखी आश्वासन,संरपंच येनाडी येनक व आमचे मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना वणी भेटीत निवेदन दि. ३०/०८/२०२३,प्राप्त झालेले पत्र दि. १९/१०/२०२३, तालुका कृषि अधिकारी, वणी यांना सुचना दि. १४/०९/२०२३,तालुका कृषि अधिकारी, वणी यांचा नुकसानीचा उत्पादन व उत्पन्न अहवाल आपणास व आम्हास प्राप्त पत्र दि. ०९/११/२०२३, आपणास दिलेले पत्र दि. १०/११/२०२३ च्या अनुषंगाने….”
वेकोलीचे बेजबाबदार व आडमुठे धोरण शेतकऱ्याच्या जिवावर उठले आहे. शेती पिकाचे नुकसान या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वेकोलीला नुकसानीचा मोबदला देण्यास भाग पाडावे अन्यथा नाईलाजाने अन्यायाच्या विरुध्द न्यायासाठी लोकशाही मार्गाने 7 दिवसाचे आत नुकसान भरपाई देण्याचा तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे.