Ajay kandewar, Wani : वणी मतदारसंघातील राजकारणात आजकाल सण-उत्सवांपेक्षा जास्त उत्साह कुठल्या कार्यक्रमाला असतो तर तो म्हणजे पक्षप्रवेश सोहळा.जिथे गावातील लोकांच्या समस्या कायम तशाच पडून आहेत, तिथे मात्र नेत्यांच्या पक्षप्रवेश मिरवणुका धडाक्यात निघताना दिसतात.“विचारसरणी बदलली म्हणून प्रवेश” ही पारंपरिक कारणं आता लोकांच्या गळ्यात उतरावी इतकी बोथट झाली आहेत. आजकालचं खरं कारण म्हणजे – खुर्चीची लालसा आणि सत्तेच्या गोडीचा मोह.सध्या प्रत्येक आठवड्याला गावोगावी, शहरोगावी “पक्षप्रवेश सोहळे” धडाक्यात होत आहेत. जणू लोकांच्या समस्या सोडवण्यापेक्षा नवीन चेहरे दाखवणे, गुलाल उधळणे आणि फटाके फोडणे हेच हल्ली राजकारणाचे काम उरले आहे, अशी जनतेत टीका होताना ऐकू येत आहे.

नुकतेच काही पक्षांनी मोठे पक्षप्रवेश मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना झेंडे दिले.काही दिवसांनी त्याच कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षात झेंडा घेताना पाहून लोक गोंधळले. “पक्षांतर हा तर नवा खेळ झाला आहे. निष्ठा नाही, फक्त संधी मिळाली की झेंडा बदलायचा,” अशी उपहासात्मक चर्चा जनतेत रंगली आहे.सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांकडे — युवकांचा रोजगार या गंभीर समस्यांकडे मात्र एकाही पक्षाचे लक्ष नाही. पण पक्षप्रवेश सोहळ्यासाठी मात्र डीजे, बॅण्ड, खुर्च्या आणि गुलाल यावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत.स्थानिक नागरिकांनीच टोमणा मारला की, “जर एवढे पैसे सोहळ्यावर खर्च करण्याऐवजी विकासकामात लावले असते, तर खऱ्या अर्थाने जनता खूश झाली असती. पण इथे तर फक्त झेंडा बदलण्याचा खेळ चालला आहे.”
राजकीय समीक्षकांचेही म्हणणे आहे की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश कार्यक्रम म्हणजे फक्त प्रचारबाजी असून, जनतेच्या खर्या अडचणी सोडवण्यापेक्षा नेत्यांना ताकद दाखवण्याचे साधन झाले आहे.

