•अजिंक्य शेंडे यांचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन
वणी :- वणी पोलिस स्टेशन हद्दीत चोरी, घरफोडी, अवैध धंदे , मारामारी , लुटमार अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झाली असून गुन्हेगारी क्षेत्रावर वचक राहिला नाही. गुन्हेगारीला आळा बसावा किंवा गुन्हेगारी नियंत्रणात रहावी . परिणामी शहराची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्फत पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावती यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे की, शहर व ग्रामीण भागांतील संशयास्पद झालेल्या मृत्यूचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले नसुन, घटना गांभीर्याने घेतल्या जात नाही. प्रकरणं दडपण्याचे काम सध्या वणी पोलिस स्टेशनला सुरु आहे. अपघात करणाऱ्या वाहन चालकाला अटक न करता त्याच्या जागी दुसरा वाहन चालक उभा केला जात आहे. असे आरोप निवेदनातून करण्यात आले आहे. तालुक्यात ट्रान्सपोर्ट कंपन्यांचं अक्षरशः जाळं पसरलं आहे. ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये परप्रांतीय लोकांचा जास्तीत जास्त भरणा आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये दिसून येतात. परप्रांतीय लोकांचं वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे.
चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दुचाकी चोरी तर रोजचीच बाब झाली आहे.नागरिकांच्या मेहनतीच्या कमाईवर चोरटे डल्ला मारू लागले आहेत. चोरट्यांनी शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भुरटे चोर आता जीवाला घोर झाले.महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून महिला मुलींची छेड काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले जात आहे. अल्पवयीन मुलींचे शारीरिक शोषण होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. बेपत्ता मुला मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळलेल्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
इतकेच नाही तर शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीही जोमात सुरु आहे. सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारी विक्रीही जोरदार सुरु आहे. वणीची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातून केली आहे.