Ajay Kandewar, Wani:वणी नगरपरिषद निवडणुकीचा राजकीय थर्मामीटर आता अक्षरशः फुल्ल गरम झाला आहे. २ डिसेंबरला मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान सुरू होणार आहे. सोमवारपासूनच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून, काँग्रेस, भाजप, उद्धव ठाकरे गट, शिंदे गट, राष्ट्रवादी (शरद पवार गट व अजित पवार गट) आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या दरबारात गर्दी केली आहे.
राजकीय नेत्यांच्या दारात “टाइम द्या साहेब…” म्हणत अर्जदारांची रांग लागली आहे. कुणी “संकटातही पक्षासोबत होतो” असे म्हणत उमेदवारीची मागणी करत आहेत, तर कुणी “यंदा चान्स आमचाच”असा आत्मविश्वास दाखवत आहेत. सध्या प्रत्येक पक्षात अंतर्गत स्पर्धा आणि फिल्डिंगचा खेळ रंगला आहे.सत्तेसाठी पूर्वी पक्ष सोडून गेलेल्यांविरुद्ध निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सूर तीव्र झाला आहे.ज्यांनी संकटाच्या काळात साथ सोडली त्यांना आता उमेदवारी कशी? असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.त्यामुळे नेत्यांसाठी तारेवरची कसरत सुरू आहे .जुने ठेवायचे की नवे आजमवायचे?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेकदा पक्ष स्वबळावरच उतरतात, परंतु यंदा समीकरणे वेगळी दिसत आहेत.वणीत भाजप, काँग्रेस, उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे),शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट आपापल्या ताकदीवर मोर्चा उघडत आहेत. मागील नगरपरिषदेत भाजपने सत्ता टिकवली तरी विरोधकांनी यंदा एल्गार ची हाक दिली आहे.पण दरम्यानच्या हालचाली पाहता ‘फिल्डिंग’ मोठी पण विकेट कोणाची?हा प्रश्न सध्या चर्चेत आहे
•आघाडी की बिघाडी……?.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “आघाडी की बिघाडी?”हा प्रश्न सध्या वणीच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कोण कोणासोबत येणार आणि कोण विभक्त होणार, यावरून नेत्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे. कार्यकर्ते व जनतेतही चर्चांना उधाण आले असून,राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

