Sunday, May 3, 2026
HomeBreaking Newsवणीत काँग्रेस नेमकी उरली तरी किती…?

वणीत काँग्रेस नेमकी उरली तरी किती…?

Ajay Kandewar,Wani:- वणी विधानसभा हा कधीकाळी काँग्रेसचा अभेद्य गड म्हणून ओळखला जात होता. स्वातंत्र्योत्तर काळापासून काँग्रेसची पकड, संघटनात्मक ताकद आणि मतदारांमधील विश्वास यामुळे वणी विधानसभा काँग्रेसच्या ताब्यात असल्याचे चित्र सातत्याने दिसत होते. मात्र बदलत्या राजकीय वास्तवात आज तोच गड काँग्रेसच्या हातातून निसटल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

अलीकडील वणी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपाने एकतर्फी विजय मिळवत स्वबळावर सत्ता स्थापन केली. हा निकाल केवळ नगरपरिषदेपुरता मर्यादित नसून, तो वणीतील बदलत्या राजकीय मानसिकतेचा आरसा ठरला. मतदारांचा कल, कार्यकर्त्यांची भूमिका आणि नेतृत्वावरील विश्वास या सर्व पातळ्यांवर काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले.

यानंतर झालेल्या वणी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा गड ढासळल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी लढत दिली गेली असली, तरी जागावाटपातील ताणतणाव, अंतर्गत असमाधान आणि गटबाजी याचा थेट फटका काँग्रेसला बसला. आघाडी असूनही काँग्रेसची भूमिका दुय्यम ठरल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली.या सगळ्यातच काँग्रेससाठी अधिक चिंताजनक बाब म्हणजे मोठ्या नेत्यांचे राजीनामे. शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा, तसेच तालुका पातळीवरील प्रभावी नेतृत्व मानले जाणारे प्रमोद लोणारे यांसारख्या नेत्यांच्या बाहेर पडण्याने काँग्रेसचे संघटनात्मक अधिष्ठान कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले. नेतृत्वाची पोकळी, दिशाहीन कार्यकर्ते आणि जनतेशी तुटलेला संवाद यामुळे काँग्रेस वणी विधानसभेत भरकटल्याचे चित्र ठळकपणे दिसत आहे.

आज वणी विधानसभा मतदारसंघात राजकीयदृष्ट्या भाजपाचाच प्रभाव दिसून येतो, तर काँग्रेसला केवळ नावापुरती उपस्थिती उरली आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. “ वणीत काँग्रेसला आता मान उरलेला नाही” अशी टीका खुलेआम ऐकू येत असून, हा इशारा काँग्रेससाठी गंभीर आहे.ही परिस्थिती अचानक निर्माण झालेली नाही. संघटन मजबूत न ठेवणे, स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष, कार्यकर्त्यांचे मनोबल न जपणे, आणि बदलत्या राजकारणाशी जुळवून न घेणे या सगळ्यांचा मिळून हा परिणाम असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळेच आता प्रश्न उपस्थित होतो : काँग्रेस नेमकी उरली तरी किती?या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने वणी विधानसभेतील परिस्थितीवर गांभीर्याने चिंतन करणे अपरिहार्य झाले आहे. आत्मपरीक्षण, नव्या नेतृत्वाला संधी, संघटनात्मक बांधणी आणि जनतेशी थेट संवाद — हे टप्पे वेळेत उचलले नाहीत, तर काँग्रेससाठी वणी विधानसभा केवळ इतिहासाचा भाग बनण्याची भीती नाकारता येत नाही.ही बातमी कोणावरही आरोप न करता, उपलब्ध राजकीय घडामोडी व निवडणूक निकालांच्या आधारे मांडण्यात आली असून, वणीतील बदलत्या राजकीय वास्तवावर विचार करायला भाग पाडणारी आहे. वणीत आहे त्या काँग्रेसमध्ये वाटेल तेवढ्या गटबाजी समोर आलेले आहेत आणि यावरून काँग्रेसमध्ये एकच प्रश्न उरतो की आता तरी गणित काँग्रेस नेमकी उरली किती हे सांगणे सुद्धा अस्पष्ट आहे अस नागरिकांतून बोलल्या जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page