Ajay kandewar,Wani:- शहरातील काही बियर शॉपी दुकानदार ग्राहकांकडून मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे उकळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बिलावरील किंमत आणि ग्राहकांकडून घेतलेली रक्कम यात तफावत असल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. हा प्रकार एका बियर शॉपीत काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आला.

आधीच वाइनच्या किंमती गगनाला भिडले असताना वणीत बियर शॉपीमध्ये ग्राहकांकडून मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे वसूल करण्याचा प्रकार नवा नाही, पण आता त्याला “सर्व्हिस चार्ज” किंवा “कूलिंग चार्ज” अशी दिखाऊ नावे देऊन अधिकृततेचा आव आणला जात आहे. प्रश्न असा आहे की, छापील किंमत स्पष्ट असताना हा अतिरिक्त चार्ज नेमका कशासाठी?ग्राहक जेव्हा बियर शॉपीत जातो, तेव्हा तो आधीच सरकार ठरवून दिलेल्या करासह किंमत चुकवत असतो. त्यावर आणखी लुटमार करणे हे कायद्याला हरताळ फासणारे कृत्य आहे. प्रशासन आणि ग्राहक संरक्षण विभागाकडे याबाबत ठोस तक्रारी असूनही ठोस कारवाई का होत नाही?
ग्राहकांची लूट चालूच राहणार का? हा प्रश्न प्रत्येक सामान्य दारूबाज ग्राहकाला पडला . लोक चुपचाप पैसे देतात, कारण वाद टाळायचा असतो; पण ही भीतीच दुकानदारांचे बळ ठरत आहे.कायदा म्हणतो, छापील किंमतीपेक्षा जास्त दर घेणे हा गुन्हा आहे. मग संबंधित विभाग गप्प का? केवळ टेबलाखालील व्यवहारामुळे हे सर्व डोळेझाक करून चालते का?आज वेळ आली आहे की अळीमिळी गुपचिळी असणाऱ्या या उत्पादन शुल्क प्रशासनाने अशा मनमानीवर अंकुश आणावा. “कूलिंग चार्ज” हे नाव घेऊन थंडगार बाटल्या विकणारे दुकानदार, खरेतर ग्राहकांच्या संयमाचेच तापमान वाढवत आहेत. अश्या मुजोर दुकानदारांवर तात्काळ कारवाई करावी अश्या मागणीला जोर धरू लागली आहे.

