•डॉ .महेंद्र लोढा यांचा धडाकेबाज नेतृत्वात विद्यार्थ्यांचे एसडीओ मार्फत मुख्यमंत्र्यांना साकडे
सुरेंद्र इखारे,वणी – महाराष्ट्रात पोलीस भरती होत असल्याने या पोलीस भरतीच्या निवडीमध्ये राष्ट्रीय छात्रसेना या विषयाचे 5 टक्के गुण देण्याचे रद्द करा अशा मागणीचे निवेदन डॉ महेंद्र लोढा यांचे धडाकेबाज नेतृत्वात पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई याना देण्यात आले आहे.
यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. शासनाने मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये पोलीस भरतीत राष्ट्रीय छात्रसेना या विषयात विद्यार्थ्यांना श्रेणी प्रमाणे एकूण गुणांचे 5 टक्के गुण अधिक देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु याचा फायदा हा केवळ शहरी विद्यार्थ्यांना होत असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा निर्णय आहे. कारण यापूर्वी गडचिरोली जिल्हा पोलीस दलात जी भरती झाली. त्यामध्ये राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच गुण देण्यात आले त्यामुळे प्रमाणपत्र नसणारे विदयार्थी गुणा मध्ये कमी असल्याने भरती प्रक्रियेत मागे पडले . क्षमता असताना सुद्धा त्यांची निवड झाली नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय छात्रसेना नसल्या कारणांनी अनेक विद्यार्थी प्रमानपत्रापासून वंचीत असल्याने 5 टक्के गुणांना मुकावे लागत आहे.
तेव्हा शासनाने राष्ट्रीय छात्रसेना या विद्यार्थ्यांना गुण द्यायचे असेल तर वेगळा आरक्षित कोटा करण्यात यावा . परंतु सर्वसामान्य पोलीस भरतीमध्ये परिश्रम करणारे विद्यार्थी हे 5 टक्के गुणामुळे मागे पडत असल्याने त्यांच्यावर अन्याय आहे तेव्हा शासनाने सर्वांसाठीच राष्ट्रीय छात्रसेना या विषयाचे गुणच रद्द करावे जेणेकरून क्षमता असलेला विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये येईल अशा मागणीचे निवेदन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरातून मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. संबधीत निवेदनाच्या प्रति गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक यवतमाळ याना पाठविण्यात आले आहे. यावेळी डॉ महेंद्र लोढा, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रमोद निकुरे, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, प्रा दिलीप मालेकार, वैभव ठाकरे व समस्त पोलीस भरती करणारे विद्यार्थी उपस्थित होते.