• हेक्टरी 50 हजार रुपये तातडीने द्या.
•माकप व किसान सभेची राज्य सरकारकडे मागणी
वणी : आधीच अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला परतीचा पावसाने पुरते डबघाईस आणल्याने या वर्षी शेतकरी अन्नालाही मुकला आहे. जीवन कसे जगावे हा त्याच्यापुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडे सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची व्यथा मांडत असतानाही शेतकऱ्याला सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून निव्वळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. या करिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.


या वर्षी नैसर्गिक संकटाने म्हणजेच अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना आपली शेती करणे महागात पडले आहे. दुबार, तिबार पेरणीने शेतकऱ्यांकडे होत नव्हतं सगळं गमावलं, कर्जबाजारी झाला, तेव्हा पुन्हा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची हाती आलेली पिके सुद्धा हिसकावून घेतली. अश्या या कठीण प्रसंगी सरकारने अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून आपले नैतिक कर्तव्य निभवावे अशी अपेक्षा असते. परंतु शासन शेतकऱ्यांची उपेक्षा करीत निव्वळ भांडवलदारांच्या खिदमतगरीत मश्गुल आहे. शेतकरी अस्मानी संकटासोबत सुलतानी उपेक्षेच्या बळी पडत आहे.


शेतकऱ्यांच्या निव्वळ तोंडाला पाने पुसल्या जात असल्याने त्याला आपल्या परिवाराचे भरणपोषण करणे कठीण जात असल्याने नाईलाजास्तव आत्महत्या करावी लागत आहे. कृषिप्रधान देशात शेतकऱ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतीव्यवस्था मोडकळीस आल्यास देशाची आत्मनिर्भरता धोक्यात यायला वेळ लागणार नाही. यासाठी शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठी त्याच्या सर्व गरजा भागविल्या गेल्या पाहिजे. शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी त्यांना तातडीने भरीव मदत होण्यासाठी हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली गेली पाहिजे, महाराष्ट्र शासनाने ताबडतोब ही दिले पाहिजे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. ऍड. दिलीप परचाके, कॉ. मनोज काळे, कॉ. नंदकिशोर बोबडे, सुशील आडकीने,आदींनी केली आहे.




