•मॅकरून शाळेत निरोप समारंभ थाटात संपन्न.
अजय कंडेवार,वणी :- विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाचा शेवटचा टप्पा म्हणजे दहावी. त्यानंतर विद्यार्थी हा विद्यार्थी दशेतून युवावस्थेत प्रवेश करणार असतो. एवढी वर्ष शाळेच्या, शिक्षकांच्या सहवासातून वेगळ्या नवीन विश्वात पाऊल टाकतांना अनेक आठवणींना उजाळा देण्याचा, जातानाचे दुःख हुरहूर पण त्याचवेळी नवीन बंधनमुक्त विश्वात पदार्पण करण्याचा आनंद व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच निरोप समारंभ…
मॅकरून इंग्लिश मीडियम स्कूलच्या वडगाव या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-2023 च्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम दिनांक 11 फेब्रुवारीला अत्यंत उत्साहात संपन्न झाला. इयत्ता ८ वी , ९ वी चे विद्यार्थी व शिक्षकांनी या समारंभाचे आयोजन केले होते.या समारंभाला अध्यक्ष MSPM’S ग्रूपचे संचालक पी. एस आंबटकर, विशेष प्रमुख पाहुणे म्हणून उपसंचालक पियूष आंबटकर, प्रमूख पाहूणे शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना व संजय दामले आदी मान्यवर उपस्थित होते.या पाहुण्याचे स्वागत श्रेया सातपुते, अंश आंडे व श्रावणी वाळके यांनी केले .
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिक्षेसाठी शुभेच्छा देवून इ १० वी च्या विद्यार्थ्यांना शाळेकडून एक आठवण म्हणून छोटेशी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. इ.८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी काही खेळ, मिमिक्री, गायन, कविता इ. मनोरंजनात्मक कलागुणांचे आयोजन केले होते. १०वी च्या काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त करून शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल व संस्थाचालकां प्रति प्रेम व आदर व्यक्त केला.तसेच फेयरवेल ऑफ द बॉय क्रिश फेरवानी तर फेयरवेल ऑफ द गर्ल मैथिली ठाकरे यांची विशेष निवड करण्यात आली. या कार्यक्रमात शिक्षक नितेश कुरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विजेता शेळकी, सनाया कठाने, प्रथिनी नागपुरे व कृतिका आंबेकर यांनी केले तर आभाप्रदर्शन श्रावणी वाळके हिने केले.
“तर आता केवळ काहीं दिवस हातात असून या दिवसांत सर्व वर्षभराची मेहनत, केलेला अभ्यास हे सर्व मांडण्याची वेळ जवळ आली असून आत्मविश्वासाने पेपर लिहून चांगलेच गुण मिळवून हातात मार्कलिस्ट घेणार असा निश्चय आत्ताच केला तर यशस्वी होणे काहीच कठीण नाही असे मोलाचे विचार संचालक पी.एस आंबटकर यांनी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले.”
“तर मुलगी सासरी जाताना जी हुरहुर अस तीच हुरहुर आज सर्व विद्यार्थ्यांमध्ये जाणवत असून त्यावरून शाळेबद्दलचे प्रेम व आदर व्यक्त होतो. शाळेतून मिळालेल्या या ज्ञानाच्या व अनुभवांच्या शिदोरीचा मोठे झाल्यावर नक्कीच उपयोग होतो व तेव्हा शाळेचे महत्त्व अजून गडद होते. त्यामुळेच ‘आवडते ही मज मनापासूनी शाळा, लाविते लळा ती जसा माउली बाळा ‘हे वाक्य तेव्हा खरे वाटू लागते असे सांगून मुख्यद्यापिका श्रीमती शोभना यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.”
या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका श्रीमती शोभना यांच्या मार्गदर्शनाखाली इ.८वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केले होते. सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी मिळून निरोप समारंभाचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केले होते.