Ajay ,Wani : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा फाटा परिसरात ‘तेजा’ नामक व्यक्तीकडून कथितरित्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी असून, खुलेआम सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या अवैध व्यवसायावर पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
बेलोरा फाटा परिसरात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा असून, संबंधित व्यक्तीला कोणाचे अभय आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकाराची माहिती स्थानिक यंत्रणेला नसावी, की माहिती असूनही कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्नही आता चर्चेत आहे. परंतु यामध्ये तो कर्मचारी फार दमून वसुली करत आहे बोलोरो फाट्याजवळ त्याचं नाव देखील उघड होणं महत्त्वाचं आहे.
अवैध दारू विक्रीमुळे शासनाचा महसूल बुडत असतानाच त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या कुटुंबांवर होत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडते, संसार उद्ध्वस्त होतात आणि सामाजिक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे अशा अवैध विक्रीला आळा घालण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे.दरम्यान, ‘तेजा’ नामक व्यक्ती अवैध दारू विक्री करीत असल्याच्या चर्चेत कितपत तथ्य आहे, याची अधिकृत चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी नियमितपणे दारू विक्री होत असल्यास त्याला कोणाचे संरक्षण आहे का, याचाही तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.आता संबंधित विभाग या कथित अवैध दारू विक्रीविरोधात प्रत्यक्ष कारवाई करणार की केवळ कागदोपत्री कारवाई दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

