Ajay Kandewar,Wani : यवतमाळ जिल्ह्यातील राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ आणि संतापजनक कारभार आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जनतेच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेले हे PHC आता उपचार केंद्र कमी आणि “रिल्स सेंटर” जास्त बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रात्रीच्या सुमारास येथे ना डॉक्टर, ना कर्मचारी… आणि याच संधीचा फायदा घेत युवकांकडून खुलेआम बर्थडे पार्टी, केक कटिंग आणि इंस्टाग्राम रिल्सचे शूटिंग सुरू असल्याचे वायरल व्हिडिओमधून समोर आले आहे.विशेष म्हणजे “24 तास सेवा उपलब्ध” असा मोठा फलक लावणारे डॉक्टर आणि कर्मचारी प्रत्यक्षात दोन तासही PHC मध्ये दिसत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, मात्र रात्री “मेरे भाई का बर्थडे है…” म्हणत युवकांची गर्दी PHC च्या प्रांगणात जमत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. यावरून हे आरोग्य केंद्र आहे की युवकांचे पार्टी आणि रिल्स शूटिंग पॉईंट, असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्याने राहणाऱ्या अनुपस्थितीमुळेच घडत आहे. विशेषतः डॉ. राहुल चिखलीकर आणि डॉ. तेजस आस्वले यांच्यावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “या दोन महारथी डॉक्टरांनी राजूर PHC अक्षरशः चुलीत नेऊन ठेवलं,” अशा संतप्त प्रतिक्रिया आता उघडपणे समोर येत आहेत. रुग्णांची सेवा करण्यासाठी नेमलेले कर्मचारी आणि अधिकारी जर केंद्रातच नसतील, तर युवकांनी तिथे अड्डा बनवला नाही तरच नवल, अशी बोचरी टीका गावकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, स्थानिक स्थायी समिती आणि संबंधित प्रशासनावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. निवडून आलेली स्थायी समिती फक्त नावापुरतीच आहे का? PHC मध्ये सुरू असलेल्या या प्रकाराकडे त्यांनी डोळेझाक का केली? असा सवाल नागरिक विचारत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक टीएचओ यांचे दुर्लक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची संशयास्पद शांतता यामुळेच हा कारभार बिनधास्त सुरू असल्याची चर्चा गावात रंगली आहे.अनेक वेळा तक्रारी करूनही डीएचओ कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. “आरोग्य केंद्र वाऱ्यावर, अधिकारी झोपेत आणि जनता त्रस्त,” अशी परिस्थिती राजूरमध्ये निर्माण झाली असून आता तरी संबंधित विभागाने जागे होऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

