Ajay Kandewar,Wani:- शहरातील पंचशील नगर परिसरात उशिरा रात्री पोलिसांनी केलेल्या धडक छाप्यात सुगंधित तंबाखूचा मोठा साठा पकडत गुटखा माफियांना जबर धक्का दिला. 112 वरून मिळालेल्या तातडीतील माहितीनंतर पोलिसांची कारवाई अक्षरशः विजेच्या वेगाने झाली. एमएच-24 बीएल-7051 या वाहनातून उतार होत असलेला बंदी घातलेल्या पदार्थांचा साठा पोलिसांनी रंगेहाथ पकडला.
मात्र… या संपूर्ण प्रकरणात अन्न‒औषध विभागाची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि उदासीन दिसत आहे. मोठी कारवाई उघडकीस येऊनही विभागाकडून आजवर एकही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. वाहन जप्त नाही पण वाहन क्रमांक माहिती उघड होऊन तंबाखूचा साठा उघड—सगळं सिद्ध असतानाही न वाहन चालकावर गुन्हा, न वाहन मालकावर! उलट “काहीतरी जुळवाजुळव” सुरू असल्याच्या चर्चा शहरभर रंगल्या आहेत.रात्रीच्या अंधारात उतार होत असलेला माल पोलिसांनी पकडला; पण अन्न‒औषध विभाग मात्र हात झटकून निर्लेप दृष्टीने पूर्ण प्रकरणाकडे पाहत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तंबाखू माफियांची आणि विभागातील काहींची “जुगलबंदी” नाही ना? असा सवालही जनतेतून सुरू आहे.
विशेष म्हणजे, मुद्दामहून विलंब करून आरोपींना पळवाट काढून देण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? असा संशय बळावत चालला आहे. कारण वाहनाचा मालक आरोपी ठरवणे ही या प्रकरणातील सर्वात आवश्यक आणि प्राथमिक कारवाई—पण तीच अद्याप झालेली नाही.जनतेचा आवाज आता अधिक तीव्र होत असून अन्न‒औषध विभागाने तातडीने गंभीरता दाखवून कारवाई करावी, अन्यथा विभागावर ‘माफियांची ढाल’ असल्याचा ठपका बसण्याची परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा नागरिक देत आहेत.

