•सिमेंट रस्ते व भूमिगत नाल्यांचे बांधकाम करण्यासाठी देण्यात आले निवेदन
सुरेंद्र इखारे,वणी :- शहरातील विठ्ठलवाडी जवळील गौरकार कॉलनी परिसरात सिमेंट रस्ते व भूमिगत नाल्यांचे बांधकाम करण्याबाबत अजिंक्य शेंडे ( युवासेना उपजिल्हा ) यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदनातून साकडे घातले आहे.
विठ्ठलवाडी परिसराला लागून असलेला गौरकार कॉलनी परिसर विकासकामांपासून कोसो दूर राहिला आहे. नगर सेवकांनी गौरकार कॉलनी येथील विकासकामे करण्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. विकासकामांच्या बाबतीत अतिशय मागासलेला हा परिसर आहे. २० ते २२ वर्षापूर्वी या परिसरात सांडपाणी वाहून नेण्याकरिता नाल्या बांधून देण्यात आल्या. या नाल्यांचा उतारही योग्य रित्या काढण्यात आलेला नाही. या नाल्या आता ठिकठिकाणी फुटल्या आहेत. या परिसरात रस्त्यांची तर अतिशय दयनीय अवस्था आहे. परिसरात रस्ताच नसल्याने शाळेच्या स्कुल व्हॅन विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत येत नाहीत. ऑटो रिक्षाही रस्त्या अभावी नागरिकांच्या घरापर्यंत यायला तयार होत नाही. ऑटो रिक्षांमधून सामान घेऊन येणाऱ्या नागरिकांना व शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अंतरावरच उतरवून दिलं जातं.
१० ते १२ वर्षापूर्वी धनराज भोंगळे नगरसेवक असतांना सिमेंट रोड बांधण्यात आला होता. पण तो केवळ अर्धवटच बांधण्यात आला.आता हा सिमेंट ही उघडला आहे.अनेकदा रस्त्याचे बांधकाम करण्याकरिता येथील नागरिकांनी वारंवार विनंती केली. पण रस्ता मात्र अद्याप बनला नाही. त्यामुळे हा रस्ता कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले की काय?अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. तसेच रस्ता बांधकामाच्या कंत्राटाची चौकशी होणे गरजेचे झाले आहे. मागील ४० वर्षांत गौरकार कॉलनी येथील मारोती खोंडे यांच्या घरापासून समोर रस्ताच बनला नसल्याचे वास्तव आहे. स्वातंत्र्याचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. पण वणी नगर परिषदेतर्गत येणाऱ्या गौरकार कॉलनी येथे ४० वर्षांपासून सिमेंट रस्ता नाही, हे येथील नागरिकांचं दुर्दैवच म्हणावं लागेल. गौरकार कॉलनी हे मान्यता प्राप्त ले-आऊट असतांनाही नझूल जागेवर वसलेला हा परिसर वाटतो आहे. अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य व डुकरांचा हौदोस या परिसरात पहायला मिळतो. शहरातील जुन्या परिसरांमधील एक असलेला हा परिसर नगर सेवकांच्या दुर्लक्षितपणामुळे विकासकामांना मुकला आहे. तेंव्हा या परिसरातही विकासगंगा बहावी ही अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या परिसराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही कधी डांबर पडले नाही. म्हणून या परिसरात सिमेंट रस्ते व नाल्यांचे बांधकाम करून गौरकार कॉलनी परिसरातील विकासकामांना हातभार लावावा.अशी मागणी रेटून धरली आहे.
मुख्याधिकारी यांना निवेदन देताना गणेश जुनघरी, मधुकर निब्रड, राहुल चंदनखेडे, रजनी चंदनखेडे, मंजुळा पाटील, विमल खोंडे, छाया हेडाऊ, आशा वसाके, नितीन हेडाऊ , प्रशांत चंदनखेडे हे सर्व उपस्थित होते.