Ajay Kandewar,Wani:-केंद्रीय मंत्री अमित शहा याचे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील विधान हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरएसएस वाल्यांच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल किती द्वेषपूर्ण भावना भरलेली आहे, याचेच त्यातून स्पष्ट प्रदर्शन झाले असून शनिवारी २१ रोजी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करीत तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली.
•काय म्हणाले होते अमित शहा?
अमित शहा यांनी संसदेत डॉ.आंबेडकरांच्या नावाची पुनरावृत्ती केल्याच्या संदर्भात भाष्य केले होते. ते म्हणाले, “आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर – इतकी नावे घेणे ही एक फॅशन झाली आहे. देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते तर देवाला आनंद झाला असता, 7 जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता.” काँग्रेसने हा केवळ आंबेडकरांचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय संविधानाचा आणि त्यांच्या योगदानाचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
वणी (उबाठा) शिवसेनेकडून किरण देरकर व संजय निखाडे यांचा मार्गदर्शनात करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात सुनिल कातकडे, दीपक कोकास, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, प्रवीण खानझोडे, बबलू मेश्राम, सुरेश शेंडे, गणेश जुनघरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
•गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा.. – किरण देरकर
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले. मात्र, त्यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेताल वक्तव्य करतात. त्यामुळे हे निषेध वणीत आंदोलन करण्यात येत आहे. देशात स्वातंत्र्यलढ्यामध्ये संघ व त्यांच्या विचारसरणीचे लोक कधीही पुढे नव्हते. देशाला तोडण्याचीच त्यांची कृती राहिली आहे. आता सहज म्हणून आंबेडकरांबद्दल त्यांचे वक्तव्य निघाले असून हे जाणीवपूर्वक केले आहे. एखादा शब्द चुकीने निघाला असता तर आम्ही समजू शकलो असतो मात्र, जाणीवपूर्वक बाबासाहेबांबद्दल द्वेषपूर्ण भावनेने वक्तव्य केले आहे. महान उंचीच्या महापुरुषाबद्दल केलेल्या या वक्तव्याबाबत माफी मागून राजीनामा द्यावाच लागेल अन्यथा आपणांस आम्हीं समस्त बहुजन माफ करणार नाही
.