Ajay,Wani: कापसाच्या शेताच्या आड गांजाची लागवड केल्याचा प्रकार पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले कुंडी शिवारात उघडकीस आला असून, पाटण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या शेतांवर छापे टाकून गांजाची ३५ झाडे जप्त केली. पोलीस ठाण्याचे ठाणेदार एपीआय मिलिंद सरकटे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.२५ वाजता ही कारवाई करण्यात आली.
शेतगट क्रमांक ४ मध्ये शेणू गोसावी कावाडे (वय ५७, रा. कुंडी) यांच्या शेतात तुरीच्या ओळींमध्ये गांजाची ३० झाडे आढळली. त्यांचे वजन ६ किलो ७८० ग्रॅम असून, किंमत अंदाजे १ लाख ३५ हजार ६०० रुपये आहे. त्यानंतर शेतगट क्रमांक ८ मध्ये मधुकर रामाजी पिटकुले (वय ४६, रा. कुंडी) यांच्या शेतात गांजाची पाच झाडे आढळली. त्यांचे वजन ७६५ ग्रॅम असून, किंमत अंदाजे १५ हजार ३०० रुपये आहे. दोन्ही ठिकाणांहून एकूण ७ किलो ५४५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, मुद्देमालाची किंमत १ लाख ५० हजार ९०० रुपये आहे.
गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून परवानगी घेत छापेमारीचे नियोजन केले. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार एपीआय मिलिंद सरकटे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान झरी येथील नायब तहसीलदार श्री. मसराम हे राजपत्रित अधिकारी म्हणून उपस्थित होते. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव, हवालदार रतीश वानखेडे, मुकेश करपते, राम राठोड, सचिन गाडगे, सदाशिव माथनकर तसेच पोलीस शिपाई प्रशांत तलांडे, सचिन बोंडे, अरविंद जाधव आणि हनुमंत सुरनर यांनी सहभाग घेतला. एकाच गावातील दोन शेतांमध्ये गांजाची लागवड आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, अंमली पदार्थांविरोधात पाटण पोलिसांनी केलेल्या या कारवाईची चर्चा सुरू आहे.
या प्रकरणी शेणू गोसावी कावाडे आणि मधुकर रामाजी पिटकुले यांच्याविरुद्ध NDPS कायद्यातील कलम ८(ब) व २०(अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुप्त माहितीच्या आधारे तातडीने पथक तयार करून दोन ठिकाणी कारवाई करण्यात आल्याने गांजा लागवडीचा प्रकार उघडकीस आला. एपीआय मिलिंद सरकटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या या कारवाईत महत्त्वाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पाटण पोलीस करीत आहेत.

